विशेष लेख – आपली लालपरी..!



आज राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी एसटी उपलब्ध करण्याचा निर्णय शासनाने केला. बातमी वाचताना एसटीने केलेला आजपर्यंतचा सगळा प्रवास क्षणात डोळ्यासमोर उभा राहिला, गावाच्या फाट्यावर तासन्तास उन्हातानात उभं राहून एसटीची वाट पाहणं आठवलं, वक्तृत्व स्पर्धा करताना नाशिक पासून गडहिंग्लज व कोकणातल्या रत्नागिरीपासून ते नागपूर पर्यंत एसटी च्या अंगाखांद्यावर केलेला प्रवास आठवला. धडगाव सारख्या अत्यंत दुर्गम भागात नोकरी करताना हीच एसटी सोबत होती..

आज कोरोनाच्या संकटात एसटी विसावा घेतेय.. मात्र सरकारच्या कुचकामी धोरणात अडकत अडखळत, रडतखडत का होईना, तोट्यात का होईना पण राज्याला धावत ठेवण्याचे काम एसटी करत होती. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास हि हमी देणारी, माय भगिनींना सणासुदीला माहेराच्या वाटेवर नेऊन सोडणारी, हात दाखवा व कुठेही थांबवा या तत्वावर अहोरात्र काम करत होती. आजही ट्रेन थांबल्यात, विमानसेवा थांबली पण अत्यावश्यक सेवेसाठी एसटी धावतेय.. चार चाकी वाहनं ढुंकून पाहायला तयार नसताना बेस्टच्या एसटीचा वापर ॲम्बुलन्स म्हणून करणाऱ्या वाहक व चालकांनी एका गरोदर महिलेला दवाखान्यात पोहोचवण्याचा प्रसंग काल-परवाच घडला..

शासनाच्या अनेक सेवा कधी ना कधी कौतुकाला पात्र ठरतात, सणासुदीला सेवा देणारे पोलीस लोकांना दिसतात, डॉक्टरांचा मोठेपण जाणवतो.. मात्र कुठल्याही धन्यवाद आणि कौतुकाची ची अपेक्षा न ठेवता धावते ती फक्त एसटी.. तुटपुंज्या मानधनावर खाकीतला चालक-वाहक रुपी सैनिक ‘डबल बेल’च्या जोरावर दिवाळी असो की दसरा हे राज्य चालत-फिरत ठेवण्याचे काम करतो.. तरीही कुठलाही मोर्चा निघाला एसटी अडवली जाते, आंदोलन झालं की पेटलेली पहिली एसटीच असते..अपघात झाला दोष एसटीवरच असतो.. एसटी धावत राहिली म्हणून गरीबांच्या लेकीबाळी माहेरी पोहोचल्या.. गाव वाड्यातली मुली शिक्षण घेऊ शकल्या. गावात पहिल्यांदा वृत्तपत्र जस एसटी पोहचवत होती तशी कुणा दूर असलेल्या जिवलगाची पत्रसुद्धा एसटीनेच पोहचत होती..

म्हणून जितकी क्रांती खेड्यात शिक्षणानं आणली तितकीच एसटीनही आणली… एक रुपया सुट्टा नाही म्हणून कंडक्टर सोबत हुज्जत घालणारा प्रवासी, सकाळी सहाच्या ठोक्याला क्लासला जायचं म्हणून एस टी ची वाट पाहणारे विद्यार्थी, नोकरीसाठी डबा घेऊन स्टॅण्डवर वाट पाहणारा चाकरमानी कितीतरी जणांच्या आयुष्यात एसटीचे अभेद्य स्थान आजही कायम आहे..कितीतरी जणांच्या प्रेम कहाण्या एसटीत आणि एसटी स्टँडवर फुलल्या आणि तुटल्याही तिथेच..

जिथे-जिथे सरकार पोचू शकले नाही, जिथे आजही रस्ते नाही तिथे एसटी पोहोचली.. वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आयुष्याला कलाटणी मिळालेल्या माझ्यासारख्या अनेकांच्या आयुष्यात एसटीचा अनुभवांचा अमोल ठेवा आहे.. एसटीच्या खिडकीतून पाहिलेला निसर्ग व आत बसून अनुभवलेला समाज कुठल्याही पुस्तकापेक्षा जास्त शिकवून गेला..

अवस्था व व्यवस्था कशीही असली तरीही आहे त्या परिस्थितीत ध्येयाचा पाठलाग करण्याचा दृष्टिकोन याच एसटीने अनेकांना शिकवला.. तिच्या सीटवर बसत किती तरी तरुणांनी भविष्याची स्वप्न पाहिली व अस्तित्वात आणली.. कुठलाही जात पात पंथ धर्म हा भेदभाव विसरून रात्रंदिवस धावणारी एसटी हीच खरी भारताच्या विविधतेत एकतेचे प्रतिक आहे..

आज एसटी विसावा घेत असताना तिची आठवण येते कारण तिचं महत्त्व प्रत्येक सर्वसामान्याला पटलंय..राज्याने कितीही प्रगती करू द्या, कितीही चारचाकी येऊ द्या.. एसटी जोवर बंद आहे तोवर राज्य बंद आहे. एसटीचा खडखडाटच आपल्याला कोरोनाच संकट दूर झाल्याची बातमी देईल, गाव गाड्याला आवाज देईल.. सुनासुना झालेला एसटी स्टँड पुन्हा गजर करील. फक्त आता परत कुठल्या आंदोलनात हि ‘लालपरी ‘  बळी पडू नये व सरकारी अनास्थेची शिकार करू नये एवढीच अपेक्षा..

– विकास नवाळे (लेेेखक प्रसिद्ध वक्ते असून भडगाव नगरपरिषद जिल्हा जळगाव येथे मुख्याधिकारी आहेत.)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *