पशुपक्ष्यांना ठेवलं अंकित
निसर्गावर करुनी घाव
आता उमगलं मानवाला
बंदीस्त काय असते राव
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असा मोलाचा संदेश संत तुकाराम महाराज यांनी दिला होता. वृक्षाला आपण सगे – सोयरे मानलं पाहिजे हा आशावाद मानवजातीकडून ठेवला होता पण मानव आपल्या स्वार्थासाठी निसर्गातील पशू, पक्षी यांना अंकित करून कित्येक वर्ष डांबून ठेवण्यात आपली हुशारी मानत आला आहे. निसर्गात विनामूल्य मिळणाऱ्या बाबी मानवाने स्वार्थासाठी सहज वापरल्या. शहरीकरण, औद्योगिकरण, तापमान वाढ, हवामान बदल इत्यादी हे सगळं घडलंय केवळ मानवाने केलेल्या कृतीचे फळ होय असचं म्हणता येईल त्याचे फळ माणसालाच भोगावे लागत आहे. म्हणतात ना!! कराल तसे भराल या उक्तीप्रमाणे निसर्गाचा समतोल संतुलित राहण्यासाठी पृथ्वीच्या एकूण तेहतीस टक्के प्रदेश वनांनी आच्छादलेला असायला हवा पण मनुष्यप्राणी भौतिक सुविधेच्या नांदी लागल्यामुळे वृक्षांची सर्रास कत्तल करून घरे, इमारती, शहरीकरण, औद्योगिकीकरण यात मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यास व्यस्त झाला आणि निसर्गाकडे नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य विसरले त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळून एका जैविक घातक विषाणूने मानवी जीवनात डंख मारायला सुरुवात केली नि अख्या जगाला निसर्गाचा समतोल ढासळला असं म्हणायला भाग पाडले.
आपल्या भारत देशाचा विचार केल्यास प्रत्येकी चार महिन्याचे तीन ऋतू आढळतात पण आताच्या निसर्गाचे चक्र बघितल्यास पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यासारखा तर उन्हाळा हा ऋतू पावसाळ्यासारखा वाटायला लागतो. कधी कधी उन्हाळ्यात चक्क गारगोटीसह, वादळवाऱ्यासह पाऊस पडतांना दिसतोय तेव्हा यावर नक्कीच विचार करण्यासारखीच बाब आहे. म्हणजेच वातावरणात बिघाड झाल्याची चिन्हे दिसत आहेत. वातावरणात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा परिणाम हवामान बदलावर होत आहे व तापमानात बदल होत आहे त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांना यांचा प्रत्यक्ष संबंध येत असून मानवासाहित इतर पशु-पक्ष्याला ह्या यातना भोगावे लागत आहे. कारण पृथ्वी या ग्रहावर आपण एकटेच नाही तर आपल्यासह पशु, पक्षीही जीवन जगत आहेत म्हणूनच निरनिराळ्या आजारांना मनुष्यासह इतरांनाही ह्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.आज संपूर्ण जगात कोविड-19 (कोरोना व्हायरस डिसीज 2019) नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जग भयभीत होऊन हैराण झालेले दिसत आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे निसर्गाचा ढासळता समतोल होय असं म्हटल्यास वावगे वाटणार नाही.
संपूर्ण जगात पूर्वी भारतीय संस्कृतीचे गोडवे गायले जायचे परंतु काही वर्षांपासून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भारतात करण्यात येऊ लागले. प्रत्येक देशाची राहणीमान, आहार, पोशाख, संस्कृती वेगवेगळी आहे. चीन देशात प्रथमतः भेट झाली असता गालाला-गाल लावणे,काही देशात जिभेला जीभ लावणे, हातात हात घेणे,आलिंगन देणे इ. यासारखी संस्कृती होती.तीच स्थिती भारतात त्याच अनुकरण करायला सुरुवात झाली होती.हीच भारत देशात पूर्वी नमस्कार करतांना दोन्ही हात छातीजवळ जोडून थोडं मान खाली वाकवून नमस्कार करण्याची पद्धत होती पण इतर देशाचं अनुकरण करीत आज हातात हात दिला जातो वा अधिक आपुलकी व प्रेम दर्शविण्यासाठी अलिंगन देणे ही संस्कृती भारतात हळूहळू रूढ होऊ लागली आहे. एवढेच नाही तर अगोदर नदीच्या काठी निसर्गात वस्ती करून मानव राहत असत पण सध्या गर्दीच्या वा शहराच्या ठिकाणी राहणे पसंद करीत असल्याने खेडी ओस पडून शहराचा विस्तार मोठया प्रमाणात होऊ लागला त्यामुळे शहरात झोपड्याची संख्या वाढू लागली तेवढ्याच प्रमाणात दुर्गंधी पसरली नि स्वतःहून रोगाला आमंत्रण मानवानेच दिला. पण आज कोविड-19 ह्या विषाणूने सर्व मानवजातीलाच शिकवण घातली असं वाटायला लागलंय हे खरंच आहे.
मानवाने माणसासाठी जीवन जगत असतांना स्वार्थ साधून इतरांचा विनाश करण्याचे षडयंत्र आखले जाऊ लागले. इतर देशावर हुकूमत, सत्ता, पैसा यासाठी कोरोना व्हायरस डिसीज यासारख्या घातक विषाणूची खैरात निर्माण करून महासत्ता बनण्याच्या नादात जीवघेणी स्पर्धा निर्माण करण्यात आली ह्या देखील गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही यापूर्वी देखील स्वाइन फ्ल्यू,बर्ड फ्ल्यू , चिकन गुनिया, माकड गुनिया यासारखे आजार येऊन त्या आजाराचे विषाणूने मानवाच्या बाजारात थैमान घातले होतेच पण कोरोना विषाणूने अख्या जगालाच संपविण्याचा घाट घातला की काय?? असे इटली,स्पेन,चीन,अमेरिका मधील कोरोनाग्रस्त बळींची संख्या बघितल्यावर वाटते. कोरोना व्हायरस संपर्कातून संसर्ग होत असल्याने आपल्या संस्कृतीही काही प्रमाणात घातक आहेत म्हणून पूर्वीपार चालत असलेल्या संस्कृतीकडे भारतातील नागरिकाने वळने खूप गरजेचे वाटत आहे तेव्हा एका घातक कोरोना विषाणूनेच शिकविले असेच मनोमन वाटते आहे.
पूर्वी कोणत्याही खेड्यातून वा शहरातून जवळच्या वा दूरच्या नातेवाईकांकडे गेलो तरी एकदम थेट घरात प्रवेश न करता घरातील स्त्री जोपर्यंत आपल्याला हात-पाय धुवायला पाणी देत नसत तोपर्यत घराच्या अंगणात थांबून राहत होतो.ही आज संस्कृती भारतातून लयास जातांना बघत आहोत कारण झोपडीची जागा आज भव्यदिव्य इमारतीने घेतली आहे. अंगण देखील धुळविरहीत फरशीने घेतली असल्याने धूळ आपल्या घरापर्यत पोहचू शकत नाही असा अघोरी घमंड बाळगत आहेत असं वाटतंय. तेवढ्यात ह्या कोरोना विषाणूने मानवाला शिकविले की,बाहेरून आल्यानंतर घरात प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुऊन टॉवेलने पुसूनच घरात प्रवेश करावा जेणेकरून आपल्या हाताला वा पायाला असलेले विषाणू बाहेर सोडत होतो हा वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायला, वैयक्तिक स्वच्छतेसोबत सामाजिक स्वच्छता राखायला हवी हे आज कोरोना विषाणूने शिकविले आता कुटुंबातील प्रमुखासह लहान मुले देखील खेळून आल्यावर,शौचाला जाऊन आल्यावर, जेवण करण्यापूर्वी व जेवणानंतर हात साबणाने वा सॅनिटायझरने धुतल्याशिवाय राहत नाही. आज हात धुणे प्रात्यक्षिकसहीत धुऊन दाखवावे लागत आहेत. म्हणजेच थोडक्यात पुर्वी अंगवळणी असलेली सवय आज अंगवळणी लावावी लागत आहे ही आपल्या मानवजातीला व भारत देशातील जनतेला दुर्दैवीची बाब आहे.
आज एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानी युगात वावरत असतांना टीव्ही, मोबाईल यासारखे साधनांमुळे जग जवळ आलं असलं तरी तेवढ्याच प्रमाणात संवाद कमी होऊ लागला. आज घरातील सदस्यांशी वार्तालाप न करता फेसबुक, ट्विटर, व WhatsApp , इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर लहान-मोठ्यासह तासनतास व्यस्त राहत होते. तसेच जीवघेण्या पबजी सारख्या गेम खेळत असल्याने रात्र-दिवस त्या खेळात मग्न होत असलेले दिसून येते.तसेच संघर्षरत धकाधकीच्या जीवनात आपल्या वृद्ध आईवडील, मुले-मुली, पत्नी यांच्याकडे दुर्लक्ष झाले पण दुर्दैवाने का होईना??? कोरोना विषाणूने घरातील मंडळींना एकत्र आणले. परस्परांशी संवाद साधण्यासाठी वेळ मिळवून दिला.त्याचसोबत मानवी वृत्ती विज्ञानाच्या ज्ञानशाखेत पोहायला हवी होती पण बेगडी वृत्ती धारण करून मंदिराकडे धाव घेऊन आपल्या जीवनाचे औक्षण मागत फिरत होते पण देव दगडात नाही तर माणसात आहे हा गाडगेबाबांचा संदेश त्यांच्या गळी उतरला हे केवळ कोरोना विषाणू मुळेच ना!! कोरोना विषाणूने शिकविलं की, देवाची भक्ती करण्यापेक्षा विज्ञानभक्ती बाळगा हे भारतातील सर्व मंदिरे आज भक्ताविना ओस पडली आहेत म्हणजे अंधश्रद्धेपासून पासून कायम मानवाने दूर राहावे. भारत देशातील सर्व मंदिरे, शहरे, कार्यालये, बसस्टेशन, रेल्वे स्टेशन, कारखाने सर्व बंद आहेत कारण कोरोना विषाणू हा संसर्गाने पसरतो यामुळे संपूर्ण भारत देश लॉकडाऊन असल्याने कोणासही बाहेर जाण्याची मुभा नाही फक्त अत्यावश्यक सेवेत कार्य करणारे पोलीस, आरोग्य, प्रसारमाध्यमातील कर्मचारी व अधिकारी आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपणा सर्वांना बाहेर न निघण्याचे विनंतीवजा आवाहन करीत आहे हे केवळ कोरोना विषाणूचे जाळे देशात विरळ करण्यासाठी व घरातील आपल्या नात्यातील गोडवा वाढविण्यासाठी केले जात आहे. एकंदरीत कोरोना या सूक्ष्म अशा विषाणूने अख्या मानवजातीला धडा दिला आहे असं म्हणावेसे वाटते.
कोरोना विषाणूचा भारतात अटकाव करण्यासाठी मानवातील स्वार्थीवृत्ती जाळून टाकायला हवी त्याचसोबत निसर्गाशी मैत्री करून निसर्ग ज्याप्रमाणे समानतेची सर्वांना वागणूक नि शिकवण देते त्याप्रमाणे निसर्गाचे अनुकरण मानवाने करावी. निसर्गातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे समजायला हवे. नैसर्गिक आपत्ती म्हणून जात,धर्म,पंथ असा विचार न करता कोरोना संकट ही एक कोसळलेली आपत्ती समजून अनेकांनी आर्थिक मदत माणुसकीच्या नात्याने केली हाच माणुसकीचा झरा अखंड तेवत ठेवण्याचा अप्रत्यक्ष संदेश कोरोना विषाणूने दिला आहे त्याचसोबत भारतातील पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या संस्कृतीचे जतन करावे असाही संदेश कोरोना विषाणूने आज शिकविला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रपिता म.गांधी यांनी दिलेला मोलाचा संदेश म्हणजे “खेड्याकडे चला” आज प्रत्येकजण आपापल्या मायदेशी परतल्यागत आले आहेत आणि शहरे सध्या ओस पडत आहे पण थोडं उशिराने का होईना हायड्रोजन बाम्बची व विध्वंसक वृत्तीच्या घमंड बाळगणाऱ्या मूर्ख माणसाला सुक्ष्मतम अशा जवळपास अदृश्य असणाऱ्या विषाणूने मानवाची जागा दाखविली आणि घरी राहा नि सुरक्षित राहा अन्यथा मृत्यूचे तांडव अख्या जगाला दाखविण्याचे धाडस विषाणूने केले पण साऱ्या गोष्टी ह्या एका कोरोना नावाच्या विषाणूने सहज शिकविले असं म्हटलं तर अजिबात वावगं वाटणार नाहीच…
दुशांत बाबुराव निमकर, चंद्रपूर (लेखक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
मार्मिक लेख
The realistic Dushant