पारनेर : गारगुंडी येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर धोंडीबा झावरे यांनी आपल्या पेन्शन मधून १ लाख ३५ हजार रुपयांचे किराणा मालासह जीवनावश्यक वस्तू गोरगरीब व गरजूंसाठी उपलब्ध करून दिली आहे. बुधवारी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर झावरे यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे या जीवनाश्यक वस्तूंचा साठा सुपूर्त केला आहे. तहसीलदार ज्योती देवरे करत असलेल्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे.
हे साहित्य देताना यावेळी तहसिलदार ज्योती देवरे, पारनेर पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर नगरे, नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय कुलट , माजी सरपंच बाळकृष्ण झावरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शंकर झावरे हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सन १९५२ ते १९९० च्या दशकात नोकरी करून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांना वाचनाची प्रचंड आवड असून त्यांनी त्यांचे हजारो पुस्तकांचे ग्रंथालय देखील जुन्नर स्थित संस्थेला भेट म्हणून दिले आहे. तसेच गारगुंडी गावातील वाचनालयासाठी जवळपास एक लाख २५ हजारांची देणगी दिलेली आहे. झावरे यांच्या या उपक्रमाचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी कौतुक केले असून त्यांची गावी जाऊन भेट घेऊन धन्यवाद दिले आहेत.