| नवी मुंबई | कोरोना (COVID – 19) च्या प्रादुर्भावामुळे भारतात तिसऱ्यांदा लॉक डाऊन जाहीर झाला. परंतु लॉक डाऊन लागू झाल्यापासून अनेक गरजू आणि बेघर लोकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर युगनिर्माते प्रतिष्ठान, बांधिलकी प्रतिष्ठान व रॉयल ग्रुप यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्व गरजू लोकांसाठी अविरत अन्नछत्र चालू केले आहे.
ही अन्नदान सेवा ४ एप्रिल पासून युगनिर्माते प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर वसमाने यांच्या संकल्पनेतून अविरत चालू आहे. यास बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्षा पल्लवी निंबाळकर, रॉयल ग्रुपचे अध्यक्ष सागर गवारे आणि त्यांचे सहकारी यांनी हातभार लावला आहे. या सामाजिक उपक्रमात किल्ले बेलापूर येथील रहिवाशी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सध्या कम्युनिटी किचन खारघर मध्ये असून त्या मार्फत सर्वत्र अन्न पुरवले जात आहे. हा यज्ञ लॉक डाऊन संपेपर्यंत चालू राहील, असेही विश्वस्तांनी सांगितले आहे. सदर अन्नदान सेवा ही नवी मुंबई येथील बेलापूर, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, कळंबोली, खारघर या ठिकाणी राहत असलेल्या गरजू लोकांना होत आहे. दररोज ५५० ते ६०० लोकांना अन्नदान सेवा सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून राबवली जात आहे. त्याचबरोबर सध्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर उभे आहे. त्यांनादेखील संस्थेच्या माध्यमातून पाणी व सॅनिटायझर वाटपाची सेवा करण्यात येत आहे.
हे सामाजिक कार्य पूर्णत्वास नेण्याकरिता विशाल पिंगळे, अक्षय चव्हाण, प्रणेश भुवड, मनोज भोईर, योगेश घरत, उपेंद्र पावरी, सचिन निघोट, चेतन शिंदे, अमृता चव्हाण, अभिजित जगताप, राजेश रासकर, अमृता जाधव, वर्षा मोटे, राकेश विश्वकर्मा आदी सहकारी मेहनत घेत असल्याचे प्रसिध्दी प्रमुख सौरभ आहेर यांनी सांगितले आहे.