| मुंबई | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिली. दिल्लीत अडकलेल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री विकास खरगे आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांशी आपण स्वतः संपर्कात आहोत. या विद्यार्थ्यांना विशेष ट्रेनने किंवा ST बसेसच्या माध्यमातून परत आणण्यासाठी शासनस्तरावर लवकरच योग्य निर्णय होईल असा विश्वासही डॉ शिंदे यांनी व्यक्त केला.
दिल्लीतील करोलबाग, ओल्ड राजेंद्रनगर भागात UPSC स्पर्धा परीक्षा कोचिंग सेंटर असल्यामुळे या ठिकाणी परीक्षेची तयारी करण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी येतात. महाराष्ट्रातील जवळपास 1500 च्या आसपास विद्यार्थी सध्या दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत. यातील काही विद्यार्थ्यांनी कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रात येण्याची इच्छा व्यक्त केली. याला तात्काळ प्रतिसाद देत आज डॉ शिंदे यांनी दिल्लीतील निवडक UPSC स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी zoom अँप्लिकेशनद्वारे संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. आपल्याला महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असा विश्वास डॉ शिंदे यांनी मराठी विद्यार्थ्यांना दिला.
दरम्यान लॉकडॉऊनच्या काळात दिल्लीत अडकलेल्या मराठी तसेच अमराठी विद्यार्थ्यांची राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या तर्फे आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील ओल्ड राजेंद्र नगर भागातील वाजीराम क्लासेस समोर ही व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील ज्या विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होत आहे त्यांनी अन्नपूर्णा किचन अंतर्गत लाभ घेण्यासाठी स्वयंसेवक श्री मुक्तेश ( +918434244444 ) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.