‘ एकीचे बळ ‘, लॉक डाऊन काळात या गावाने घालून दिला नवा आदर्श..!

| नाशिक – वैभव गगे, प्रतिनिधी | इगतपुरी तालुक्यातील फांगुळ गव्हाणमधील शिवाजीनगर भागातील ग्रामस्थांनी लाॅकडाऊन दरम्यान एकीच्या बळावर केलेल्या अनोख्या कामाने या भागाचा पाणीप्रश्न कायमचा सोडवला असून एकतेने काम करून समस्या सोडवण्याचा ग्रामीण समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे..

फांगुळगव्हाण शिवाजीनगर भागात पाण्याची समस्या पाचीलाच पुजलेली होती. उन्हाळ्यात पाईपलाईनद्वारे पाणी येते मात्र पावसाळ्यात वीजेची अडचण, मशीन वारंवार बिघडणे यामुळे पाण्याची समस्या जाणवत होती. पावसाळ्यात महिलांना निसरड्या बांधांवरून ५०० – ५०० मीटर अंतरावर पायी चालत जावे लागत असे. बांधावरून घसरल्यामुळे काही गर्भवती महिलांना त्रास झाल्याची घटनाही येथे घडल्या आहेत.

या भागात कोणतीही विहीर नसल्याने व गावची पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याने या पावसाळ्यातही महिलांना खूप त्रास होणार होता. ग्रामपंचायत व सरकारी स्तरावर पाठपुरावा करूनही हा प्रश्न कित्येक वर्ष सुटला नाही. यावर येथील सेवाभावी तरूण धनराज म्हसणे, ईश्वर चव्हाण यांनी सर्व तरूणांना एकत्र करत लाॅकडाऊन मध्ये आपण घरी घालवत असलेला वेळ सत्कारणी लावून या परिसरात विहीर खोदण्याचा व विहीरीपासुन रस्ता बनवण्याचा विचार बोलून दाखवला.

यावर शिवप्रेमी मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकविचार करून कृष्णा आंदाडे, रायबा भगत, खुशाल चव्हाण, भागिरथ म्हसणे, रतन म्हसणे, धनराज भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनाथ भटाटे, दिनेश आंदाडे, चंद्रकांत गतिर, अक्षय चव्हाण, अजय म्हसने, बाळू आंदाडे, हरीभाऊ म्हसने, रांमकीसन म्हसने, प्रमोद म्हसने, रामेश्वर भागडे, बजरंग म्हसने, संतोष म्हात्रे, युवराज भागडे, आजय म्हसने, भगवान तोकडे, दिनेश भागडे, प्रशांत म्हसने, शांम म्हसने, गणेश म्हसने, चंद्रकांत म्हसने, भरत हालदे, किशोर म्हसने या तरूणांनी विहीर खोदायच्या कामाला सुरूवात केली.

 तरूण करत असलेले काम पाहून शिवाजीनगरमधील सर्व आबालवृद्धांनी आपापल्या घरातील साहित्यानिशी यथाशक्ती मदत केली. अवघ्या ५ दिवसात २० फूट खोल विहीर खोदली  व परिसरातील दानशूर व्यक्तींची मदत घेवुन विहीरीच्या कठड्याचे बांधकाम सिमेंट काॅक्रीटचे बांधकामाचे कारागीर सुभाष म्हसणे, आशोक म्हसणे, हरीचंद्र भागडे, राजु भागडे, सोमनाथ म्हसणे, मनोहर म्हसणे, रतन म्हसने या सर्वांनी विनामुल्य पूर्ण केले. पुरूष मंडळीचे काम पाहुन शिवाजीनगरमधील महिलांना स्वयंप्रेरणेने विहीरीपर्यत जाणारा रस्ता दगड, माती व वाळूच्या सहाय्याने पूर्ण केला.

या भागातील नागरिकांनी केलेल्या या कामाचे तालुकाभरातुन कौतुक होत असुन अशाप्रकारे एकजुटीने नागरिकांनी काम केल्यास गावांच्या समस्या सुटण्यास वेळ लागणार नाही. सदर कामासाठी भगवान महाराज म्हसणे- मानवेढे, राजीव कुमार सर, शक्ती उपाधाय-समृद्धी महामार्ग , वैकटेश भागडे-नांदगावसदो, तलाठी ठाकरे, ग्रामसेवक सानप, शिक्षक वैभव गगे सर व शिवप्रेमी मित्र मंडळ, सर्व महीला भगिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया..!
आपल्या समस्या सोडवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहता एकजुटीने काम केल्यास यश नक्की मिळते व समस्या लवकर सुटतात याचा अनुभव आला..
– धनराज म्हसणे
उद्यापासून नवी लेखमाला..!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *