व्यक्तिवेध – दिलखुलास लेखक पु. ल. देशपांडे..

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हटले की डोळ्यासमोर पहिले येते ते पु. लं. देशपांडे अर्थात भाई यांचे. काही मोजक्या व्यक्तींनी आपल्या विनोदबुद्धीने विनोदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला यात पु. लं. यांचा मोठा वाटा आहे. वयाच्या पाचव्या वर्षी भाषण करायला शिकलेल्या पु. लं. नी पुढे अनेक दशके महाराष्ट्राच्या श्रोत्यांना आपल्या अमोघ वाणीने व खुमासदार शैलीने मंत्रमुग्ध केले. तुरटी ज्याप्रमाणे गढूळ पाणी स्वच्छ करते त्याप्रमाणे विनोद जीवनाला शुद्ध करतो.

हास्य आणि विनोद ही २ मोठी रहस्ये संपुर्ण महाराष्ट्राला उलगडून दाखवणारे पु. लं. एक अचाट, अफाट आणि उपमारहीत व्यक्तिमत्त्व होते. दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंगांना आपल्या निरीक्षणाने गमतीदार बनवणारे पु. लं. उत्तम नकलाकार होते. त्यांचे अनेक विनोदी किस्से त्यांच्या भाषा प्रभुत्वाची व हजरजबाबी पणाची साक्ष देतात. कथा, पटकथा, संवाद, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, नाटककार, वक्ते अशा अनेक क्षेत्रात पु.लं. ना विलक्षण गती होती. त्यांचे विनोद, प्रवासवर्णने, नाटके आजही इंटरनेटवर मोठ्या आवडीने पाहिले जातात.

दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणाला पंडीत नेहरू यांची मुलाखत घेणारे पु. लं. भारतीय दूरदर्शनचे पहिलेच मुलाखतकार होते. पु. लं. नी केलेल्या कोट्या, विनोदी किस्से, नाटके आजही खळखळून हसवतात. काही संवाद आत्मपरीक्षण करायला लावून जीवनाला दिशा देतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या एकेक पैलूंवर स्वतंत्र पुस्तके लिहली जातील.

आज पू ल देशपांडे यांची पुण्यतिथी…! त्या निमित्ताने महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा उज्जवल करणाऱ्या या बहुआयामी, महाराष्ट्रभूषण साहित्य शिरोमनीस सलाम..

विनोद खटके, बारामती 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *