लंडन – जागतिक टेनिसमध्ये सर्वात मानाची समजली जात असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा अखेर करोनाच्या धोक्यामुळे रद्द करण्यात आली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर इतक्या वर्षांनी ही स्पर्धा रद्द झाली आहे. आता ही स्पर्धा पुढील वर्षी 28 जून ते 11 जुलै या कालावधीत होईल.
या स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न जगातील प्रत्येक टेनिसपटू पाहतो. तसेच इंग्लंडमधील प्रत्येक टेनिस शौकिन ही स्पर्धा पाहण्यासाठी वाट्टेल त्या दराचे तिकीट काढतो त्या स्पर्धेला रद्द करण्याची नामुष्की खूप वर्षांनी आली आहे. जागतिक टेनिसमध्ये ग्रॅण्डस्लॅम दर्जाच्या चार स्पर्धा होतात. त्यात विम्बल्डन ही सर्वात मानाची स्पर्धा समजली जाते. अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन या आणखी तीन स्पर्धांमुळे चार ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांचे वर्तुळ पूर्ण होते.