करमाळ्यातील नरभक्षक बिबट्याचा खेळ संपला; अखेर नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश..!

| सोलापूर / महेश देशमुख | अखेर करमाळा तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात यश आलं आहे. वांगी नंबर ४ गावाजवळ बिबट्याचा शार्प शूटरने अचूक वेध घेत, अखेर नाईलाजाने त्याला ठार मारले आहे, या बिबट्याला दिसताचक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश होते.

गेल्या पंधरा दिवसांपासून करमाळा तालुक्यात तीन लोकांचे बळी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला आज वांगी नंबर ४ येथील रांखुडे वस्तीवरील पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत ठार मारण्यात वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना यश आले.

सततची मनुष्यहानी टाळण्यासाठी बिबट्याला ठार मारण्याची परवानगी वनविभागाने दिली होती. त्यानंतर वनविभागाचे पथक शार्प शुटर सह बिबट्याचा शोधात गेले काही दिवस गस्त घालत होते पण बिबट्या त्यांना अनेकवेळा चकवा देऊन पळून गेला होता. आज अखेर वनविभागाला त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले. त्यामुळे करमाळ, माढा व जामखेड तालुक्यात निर्माण झालेले बिबट्याच्या दहशतीचे वातावरण संपले आहे.

धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या गोळीने घेतला बिबट्याचा अचुक वेध

अकलूज येथील माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव डॉ.धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे हर्षवर्धन तावरे व वनविभागाचे डॉ.चंद्रकात मंडलिक यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी नंबर ४ येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र अतिशय सावध असलेल्या मोहिते- पाटील यांनी १५ फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर ३ गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *