पालिका निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबई भाजपला जबर धक्का..!

| नवी मुंबई | विधानसभा निवडुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक घेऊन भाजपचे कमळ हाती घेतलेले ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांचा बुरुज हळूहळू ढासळू लागला आहे. गेल्या वर्षी तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता दिघा येथील दुसरे माजी नगरसेवक नवीन गवते यांनी त्यांची पत्नी व भावजय यांच्यासह पालिका निवडणुकीच्या तोंडावर नाईकांची साथ सोडली आहे. त्यांनी मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शिवसेना प्रवेश केला आहे. कुलकर्णी, गवते यांच्यानंतर आणखी बारा माजी नगरसेवक सत्ताधारी महाविकास आघाडीची कास धरणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या वर्षी केंद्रात भाजपची एकहाती सत्ता आल्याने राज्यातही भाजप बाजी मारणार असे गृहीत धरून राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेत्यांनी भाजपप्रवेश केला होता. त्याला नाईक अपवाद नाहीत. राष्ट्रवादीबरोबर वीस वर्षे असलेले ऋणानुबंध तोडून नाईक यांनीही विधानसभा निवडणुकीअगोदर भाजपचा झेंडा हाती घेतला. मावळत्या पालिका सभागृहातील ५२ नगरसेवकांनी त्या वेळी त्यांना साथ दिली. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पालिका निवडणुकीच्या तीन महिने अगोदर गेल्या वर्षी तुर्भे येथील नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या चार समर्थक नगरसेवकांसह शिवबंधन हातावर बांधले. कुलकर्णी हे नाईकांचे खंदे सर्मथक मानले जात होते. त्यांना तीन वेळा स्थायी समिती सभापती पदाची संधी दिली होती. नाईकांबरोबर भाजपप्रवेश करणाऱ्या ५२ नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत जाणार होते, मात्र करोनामुळे निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने ही घरवापसी थांबली होती. ती पुन्हा सुरू झाली आहे.

मंगळवारी झोपडपट्टी भागातील एक प्रबळ नगरसेवक नवीन गवते, त्यांची पत्नी अपर्णा गवते आणि भावजय दीपा गवते यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. गवते कुटुंबावर यापूर्वी दिघा एमआयडीसी भागातील बेकायदा बांधकामांबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत. नवी मुंबईतील गाजलेले दिघा बेकायदा बांधकाम प्रकरण त्या वेळी चर्चेत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने येथील तीन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी गवते कुटुंब शिवसेनेची कास धरणार हे निश्चित होते. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शिवसेना प्रवेश दिला आहे.

आणखी बारा जण तयारीत?

नाईकांची ताकद दाखविण्यासाठी भाजपच्या उंबरठय़ापर्यंत गेलेले काही नगरसेवक आता परतत आहेत. त्यापैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेत गेले असून नेरुळ, वाशी, घणसोली व कोपरखैरणे व ऐरोली येथील आणखी दहा ते बारा नगरसेवक हे पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीत परतणार आहेत. त्यामुळे नाईकांचे मोठे संख्याबळ घटणार असून पालिकेत पुन्हा सत्ता आणण्यासाठी नाईकांना जंगजंग पछाडावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *