भयंकर : कोरोना झालेल्यांना ही पुन्हा होत आहे कोरोनाची लागण, गुजरात मध्ये सापडली पहिली केस

| गुजरात | कोरोना एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही, या समजाला छेद देणाऱ्या घटना हाँगकाँग, बेल्जियम नेदरलँड्समध्ये घडल्या होत्या. आता भारतातही असं उदाहरण समोर आलं आहे. काही रुग्णांना एकदा संसर्ग होऊन बरं झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्यांचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही चिंता वाढली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील ५४ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त होऊन बरी झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. २३ ऑगस्ट रोजी RT-PCR तपासणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं आहे. याआधी एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ही महिला कोरोनामुक्त झाली होती.

मंगळवारी इसानपूर रुग्णालयातील डॉक्टरांनी दावा केला की, ‘एप्रिलमध्ये कोरोनाग्रस्त असल्यामुळे उपचारानंतर संबंधित महिला कोरोनामुक्त झाली होती. परंतु, आता या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.’ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, कदाचित एकदा लागण झाल्यानंतरही पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं उदाहरण असू शकतं. रतन रुग्णालयात महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रज्ञनेश वोरा यांनी सांगितलं की, ‘या प्रकरणात महिलेला कोरोनाचा पुन्हा संसर्ग झाल्याचं दिसत आहे. चार महिन्यांपर्यंत या महिलेला कोणत्याही समस्या उद्भवल्या
नव्हत्या. परंतु, चार महिन्यांनी महिलेत पुन्हा एकदा कोरोनाची लक्षणं दिसून आली. याआधी महिलेचा रिपोर्ट दोन वेळा नेगेटिव्ह आला होता.’

सूत्रांच्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी महिलेला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर तिला अहमदाबादच्या सिविल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे तिची दोनदा कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यात ती महिला नेगेटिव्ह आढळून आली. २० ऑगस्ट रोजी महिला रेपिड अँन्टीजन टेस्टमध्ये पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं. पहिल्यांदा नेगेटिव्ह आल्यानंतरही चार महिन्यांनी म्हणजेच, २३ ऑगस्ट रोजी RT-PCR मध्ये महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं.

एकंदरीत, यामुळे पुन्हा दुसऱ्या फेजकडे कोरोनाचे संक्रमण होत आहे का..? की एवढ्या कालावधी नंतर शरीरातील कोरोना विरूद्ध तयार झालेल्या अँटी बॉडी कोरोना रोखण्यासाठी कमकुवत ठरतात का.? पुन्हा संसर्ग होत असेल तर कोरोनाची घातक क्षमता वाढत आहे का? आदी बाबींवर संशोधकांना लक्ष द्यावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *