मोठा निर्णय : शिवसेना बिहार मध्ये ५० पेक्षा जास्त जागा लढविण्याची शक्यता..

| मुंबई | बिहारमधे आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या विचारात आहे. यासाठी शिवसेनेचे बिहार राज्यातील पदाधिकार्यांनी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक लढवावी. यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे आग्रह धरला आहे. बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईत येऊन खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. शिवसेना आपल्या विचारधारेपासून कधीही घुमजाव करत नाही. जे या विचारधारेशी सहमत असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात, असे बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.

बिहार राज्यातील शिवसेनेचे प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी संजय राऊतांची भेट घेतली. राऊत यांनी बिहारमधील पदाधिकाऱ्यांची मागणी ऐकून घेतली. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊत यांनी नेत्यांना सांगितले. बिहार विधानसभा निवडणूक शिवसेनेने याआधीही लढवत होती. त्यामुळे यावेळीही रिंगणात उतरण्याबाबत निर्णय घेऊ, असेही राऊत यांनी चार दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.

यावेळी बोलताना हौसलेंद्र शर्मा म्हणाले की, भूमिपुत्रांचा विकास आणि प्रखर राष्ट्रवाद हे मुद्दे घेऊन शिवसेनेची स्थापना झाली होती त्याच मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल. आमचे भूमिपुत्र रोजगारासाठी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत गेलेले आहेत. शिवसेनेने २०१५ मध्ये ८८ जागा लढवल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *