राहूल जगताप हेच तालुक्याच्या राजकारणातील किंग; पाचपुते – नागवडे गटाला धक्का..!

| श्रीगोंदा | श्रीगोंदा बाजार समितीच्या चुरशीच्या लढाईत माजी आमदार राहुल जगताप गटाने विद्यमान आमदार बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे गटाला चांगलाच दणका दिला आहे. सभापती पदी जगताप गटाचे संजय जामदार यांनी १० मते मिळवत बाजी मारली आहे, तर नागवडे पाचपुते गटाचे उमेदवार लक्ष्मण नलगे यांना ७ मते मिळाली आहेत. तसेच मीना आढाव याना १ मत मिळाले आहे तर उपसभापती पदी जगताप गटाचे संजय महांडुळे यांनी १० मते मिळवत बाजी मारली आहे तर विरोधी गटाचे वैभव पाचपुते याना ८ मते मिळाली आहेत.

दरम्यान, सभापती पदासाठी लक्ष्मण नलगे, मीना आढाव, संजय जामदार या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले होते. तर उपसभापती पदासाठी संजय महांडुळे, वैभव पाचपुते व मीना आढाव या तिघांनी अर्ज दाखल केले होते. मीना आढाव यांनी नंतर उपसभापती पदाचा अर्ज माघे घेतला पण आढाव यांनी सभापती पदासाठी अर्ज भरल्यामुळे जगताप गटाची काही काळ चांगलीच गोची झाली होती. अर्ज माघारी घेण्यासाठी आढाव यांच्या पतीच्या माध्यमातून निरोप पोहोचवण्यात आला. तरी देखील मीना आढाव यांनी वेळेचे कारण देत आपला सभापती पदासाठी अर्ज कायम ठेवला. आढाव यांचा सभापती पदासाठी अर्ज राहिल्यामुळे मोठा ट्विस्ट निर्माण झाला होता.

परंतु राहुल जगताप गटाने शेवटच्या क्षणी आपली यंत्रणा राबवत सभापती उपसभापती पदी बाजी मारली. विद्यमान आमदार पाचपुते गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो निवडणूक प्रक्रिये ठिकाणी पो नि दौलतराव जाधव व पो उपअधीक्षक संजय सातव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आजच्या निवडणुकीचे विशेष म्हणजे पाचपुते गटाचे दोन संचालक फुटले आजच्या निवडणुकीत पाचपुते, नागवडे गट एकत्र असल्यामुळे पाचपुते गटाचे पारडे जड मानले जात होते, परंतु पाचपुते गटाचे दोन संचालक जगताप गटात सामील झाले त्यामुळे जगताप गटाचे पारडे जड होऊन विजय सुकर झाला. या निवडणुकीतून राहूल जगताप यांनी आपला राजकीय पोक्तपणा दाखवत आपल्या राजकीय खेळीने पाचपुते आणि नागवडे गटाला जोराचा झटका दिला असून तालुक्याच्या राजकारणात आपणच हुकमी एक्का आहोत हे दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *