विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी प्रथम, घरूनच परीक्षा देण्याच्या विविध पर्यायांवर काम सुरू..!

| मुंबई | अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्या नंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली होती. परीक्षा कशा प्रकारे घेता येईल यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे.

उदय सामंत यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षा कशा घ्यावी यासाठी समिती नेमली होती. आज या समितीबरोबर तसंच इतर कुलगुरूंशी चर्चा झाली. सर्व विद्यापीठातील ७ लाख ९२ हजार ३८५ विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यापीठांनी शासनाला विनंती केली आहे. यूजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी. काही विद्यापीठांनी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागावी अशी विनंती केली आहे. आम्ही याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. परवा आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक होईल.’

‘ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ‘काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावतील. विद्यार्थींना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षा कशा पद्धतीने, कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती परवा आपला प्रस्ताव सादर करणार आहे. विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत झालं आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.’

‘कोरानाच्या काळात परीक्षा घेणं जिकिरीचे आहे, पण कुलगुरू ते योग्य पद्धतीने पार पाडतील. परीक्षा कमी मार्कांची असेल त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही.’ असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परीक्षा घेणे बंधनकारक असले तरीही शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीने त्या परीक्षा घरूनच घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्यासाठी वेगवेगळे पर्याय देखील तपासले जात आहेत. एकंदरीत विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही या भूमिकेशी सरकार ठाम असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *