| शिवसेना | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत शिवसेनेने घेतला हा निर्णय..!

| मुंबई | राज्यात वर्षभरापूर्वी शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. कित्तेक वर्ष मित्र असलेले दोन्ही पक्ष कट्टर विरोधक बनले. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. सरकारचे काम चांगले चालले असल्याने तिन्ही पक्षांचा चांगला ताळमेळ जमला आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची बैठक झाली. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वर्षा बंगल्यावर मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. काल झालेल्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांचे प्रश्न होते ते मांडण्यात आले. तसेच निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती संजय राठोड यांनी दिली. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर, शंकरराव गडाख, संजय राठोड हे मंत्री हजर होते. तर इतर मंत्री बैठकीला ऑनलाइन उपस्थित होते.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. यावरून तिन्ही पक्ष एकत्र आल्यास काय परिणाम होऊ शकतात. याचे आकलन करण्यास कमी पडलो असे भाजपचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या पुढच्या निवडणुका योग्य नियोजन करून लढू, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. यावरून महाविकास आघाडीतील पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्यास भाजपाला त्या निवडणुका जिंकणे अवघड होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *