| मुंबई | “शिवसेना खासदार संजय राऊत शिवसेनेला खड्ड्यात घालण्याचं काम करत आहेत. संजय राऊत वारंवार शिवसेनेला आणि शिवसेना नेतृत्वाला फसवण्याचं काम करत आहेत”, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी केली.
आजच्या सामना रोखठोकमधून मोदी शहा यांच्या मनमानीने आणि चार-पाच उद्योगपती मिळून देश चालला असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर बोलताना सामनाच्या रोखठोकमधूल “राऊतांचा आरोप बिनबुडाचा आरोप आहे. वास्तवाशी त्याचा काही संबंध नाही”, असा पलटवार लाड यांनी केला.
राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची गरज
मोदींवर टीका करण्यापेक्षा राऊतांनी राज्यातलं पाहावं. राज्याला सध्या फुल टाईम मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आम्ही पण म्हणू शकतो की एकच माणूस महाराष्ट्र चालवतोय. पण सरकारमधील मंत्री आणि पक्ष आपापल्या पद्धतीनुसार निर्णय घेत असतो. हा सरकार आणि पक्षीय पातळीवर ज्याचा त्याचा विषय आहे, असं लाड म्हणाले.
नाथाभाऊंनी सीडी लावावीच
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आलेली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अगदी दोन महिन्याच्या आतच त्यांना ईडीची नोटीस आली आहे. याविषयी दरेकर यांना विचारलं असता ते म्हणाले, “जर नाथाभाऊंनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरुन जाऊ नये. ईडीला सहकार्य करावं आणि राहिला विषय त्यांच्या सीडीचा…. तर त्यांच्याकडे असलेली सीडी त्यांनी खुशाल लावावी, असं आव्हानही लाड यांनी नाथाभाऊंना दिलं.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन राजकीय पुरस्कृत
दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे राजकीय पुरस्कृत आहे. तसंच या आंदोलनात डावे सामिल झाले आहेत. शेतकरी हिताचे कायदे असून देखील आंदोलक शेतकरी या कायद्याला विरोध करतायत. एकतर सरकारने त्यांची बाजू समजावून घेऊन चर्चेची तयारी केंद्राने दाखवलेली आहे. सविस्तर प्रस्तावही पाठवला आहे. पण शेतकऱ्यांना सरकारचं म्हणणंच ऐकून घ्यायचं नाही, असं लाड म्हणाले.
विजय वडेट्टीवारांना काँग्रेसचे नेते किंमत देत नाहीत
विजय वडेट्टीवर हे प्रसिद्धीसाठी काहीही बोलत असतात. त्यांना काँग्रेसचे नेतेही किंमत देत नाहीत. एखाद्या संस्थेवर वडेट्टीवारंना आकोर करणं मंत्री म्हणून शोभतं का?, असं लाड म्हणाले.
केंद्राने निधी दिला नाही, हे साफ चुकीचं
केंद्र सरकारने कोरोना काळात निधी दिला नाही, हे महाविकास आघाडीतील नेत्यांचं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. जसं कोरोना काळात राज्यावर आर्थिक संकट आहे तसं केंद्रावर पण आहेच ना पण त्यातूनही केंद्राने राज्याला भरघोस मदत केलीय. राज्यातील अनेक विकासकामं आहेत, ती आता सरकारने पुर्ण करायला हवीत, असं सरतेशेवटी लाड म्हणाले.