| मुंबई | कोरोना टाळेबंदी आणि त्यानंतर मराठा आरक्षणातील पेच यामुळे चार महिन्यांपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता सुरळीत झाली असून नामांकित महाविद्यालयांतील ७५ टक्के जागांवरील प्रवेशही पूर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेच्या दुस-या फेरीनंतर, पुढील आठवडाभरात अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार महाविद्यालये करत आहेत.
सध्या राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. कोरोना आणि आरक्षणातील पेच यामुळे प्रवेश प्रक्रिया यंदा रखडली. नियमानुसार प्रवेश क्षमतेच्या ७५ टक्के प्रवेश झाले की अकरावीचे वर्ग सुरू करता येतात. बहुतेक नामांकित महाविद्यालयांतील जागा यंदा पहिल्या फेरीतच भरल्या होत्या. मात्र पहिली फेरी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यानंतर पहिल्या फेरीत आरक्षण लागू करून झालेले प्रवेश कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवेश होऊनही अनेक महाविद्यालयांनी वर्ग सुरू केले नाहीत. मात्र, आता दुस-या फेरीनंतर अकरावीचे वर्ग सुरू करण्याची तयारी महाविद्यालये करत आहेत. दुस-या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी गुरुवापर्यंत मुदत आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात ऑनलाइन वर्ग सुरू होऊ शकतील.