अखेर या उमेदवाराला उदयनराजेनी दिला पाठिंबा..!

| सातारा | राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून, पुणे विभागातही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील दोन्ही जागांसाठी चुरस वाढली आहे. आपल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी भाजपाकडून मोर्चे बांधणी सुरू असतानाच भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवाराला पाठिंबा दिल्याची चर्चा रंगली होती. अखेर उदयनराजे यांनी भूमिका जाहीर केली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी व भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुकीसाठी भाजपाकडून पदवीधरसाठी संग्राम देशमुख, तर शिक्षक मतदार संघातून जितेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीचे अरुण लाड, पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे व अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी भाजपा, आघाडीपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

श्रीमंत कोकाटे व अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या भेटीने उदयनराजेंच्या भूमिकेबाबत चर्चा सुूरू झाली होती. अॅड. रूपाली पाटील-ठोंबरे या सातारा जिल्ह्यातील बावधन (ता वाई ) येथील असल्याने त्याबाबतही चर्चा सुरू होती. उदयनराजेही या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर होते. त्यामुळे सर्वत्र साशंकता होती. आज त्यांनी भाजपाच्या उमेदवारांना पाठिंबा देत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

उदयनराजेंच्या या पाठिंब्यामुळे भाजपाला साताऱ्यातून पाठबळ मिळाले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी देखील प्रचारात भाजपाचे उमेदवार निवडून आणायचेच असा चंग बांधला आहे. साताऱ्याचे महाविकास आघाडीचे खासदार श्रीनिवास पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जितेंद्र शिंदे आदींनी प्रचारात व नियोजनात लक्ष घातल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या साताऱ्यातील बाल्लेकिल्ल्यात महाविकास आघाडी आणि भाजपात चुरस वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *