अटळ सत्तांतर, ‘ ट्रम्प सरकारच्या पराभवावरून सेनेचा मोदींना खोचक टोला..!

| मुंबई |अमेरिकेतच नुकतीच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीची चर्चा भारतातही सुरू आहे. बायडेन यांनी ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळवला. या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून पंतप्रधान मोदींनी  चिमटा काढण्यात आला आहे.

‘तेजस्वी, बायडन! अटळ सत्तांतर’ म्हणत या अग्रलेखातून मोदींवर आरोप करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यांचा सरकारी खर्चाने प्रचार करण्यात आला. याचमुळे कोरोनाचे संक्रमण पसरले आणि हे नाकारता येत नाही असा आरोप शिवसेनेने केला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात…..
”अमेरिकेत सत्तांतर झालेच आहे, बिहार सत्तांतराच्या शेवटच्या पायरीवर आहे. अमेरिकेत प्रे. ट्रम्प महाशयांनी कितीही अकांडतांडव केले, तरी डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडेन हे दणदणीत मताधिक्याने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले आहेत. प्रे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी कधीच लायक नव्हते. त्यांच्या माकडचेष्टा व थापेबाजीस अमेरिकेची जनता भुलली, पण त्याच ट्रम्प यांच्याबाबत केलेली चूक अमेरिकन जनतेने फक्त चार वर्षांत सुधारली. त्याबद्दल तेथील जनतेचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. अशा माणसाच्या हाती अमेरिकेची सूत्रे चार वर्षे होती व हिंदुस्थानातील भाजपा पुढारी व राज्यकर्ते ‘नमस्ते ट्रम्प’साठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत होते. ट्रम्प यांना ऐन ‘करोना’ काळात गुजरातमध्ये आमंत्रित करून सरकारी खर्चाने प्रचार केला व त्यातूनच करोनाचे संक्रमण पसरले, हे नाकारता येणार नाही. आता अमेरिकेच्या लोकांनी ट्रम्प यांचे संक्रमण संपवले ते कायमचे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“ट्रम्प यांनी पराभव स्वीकारायला नकार दिला आहे. मतमोजणी व मतदानात घोटाळे झाले आहेत, असा हास्यास्पद आरोप त्यांनी केला. अनेक मोठ्या राज्यांनी ट्रम्प यांना नाकारले. ट्रम्प यांचे सध्याचे वर्तन म्हणजे ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा पद्धतीचे आहे. त्यामुळे आपल्या राष्ट्राची अप्रतिष्ठा होत असल्याचे त्यांच्या खिजगणतीतही नाही.

प्रे. ट्रम्प यांचा पराभव म्हणजे माजोरडेपणाचा, पैशांच्या मस्तीचा पराभव आहे. हाती सत्ता, पैसा आणि टगे मंडळींची टोळी असली की, हवे ते साध्य करता येते या मस्तीचा पराभव आहे. लोकशाहीत जय आणि पराभव हे नम्रपणे स्वीकारायचे असतात, लोकांचे आभार मानायचे असतात, पण या नम्रपणाचे कोणतेही संस्कार नसलेल्या ट्रम्प यांनी लोकांचा कौल ठोकरून जे तांडव सुरू केले आहे, ते कृत्य भयंकर आहे. अशा ट्रम्पसाठी आपल्या देशात स्वागताच्या पायघड्या घातल्या गेल्या, हे विसरता येणार नाही.

चुकीच्या माणसांच्या मागे उभे राहणे ही आपली संस्कृती नाही, पण तसे पायंडे पाडले जात आहेत. ट्रम्प यांच्या पराभवातून काही शिकता आले तर पाहावे इतकेच आता म्हणता येईल. जगातल्या प्रमुख लोकशाही राष्ट्रांत हिंदुस्थानबरोबर अमेरिकेचाही संदर्भ येतो, पण लोकशाहीचा लेप लावून काही लोक नौटंकी करीत असतात व ‘लोकशाहीचे बाप आपणच आहोत’, असा आव आणत असतात,” अशा शब्दात शिवसेनेनं प्रत्यक्षरीत्या भाजपावर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *