अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, २००५ नंतर आजच अतिवृष्टी..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या. कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

मुंबईत पावासाने दाणादाण
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *