अनेक विभागांची मोट बांधून खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात – आदित्य ठाकरे; मनसेचा नुसता विरोधास विरोध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..!

| कल्याण | विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात आले होते. कल्याण डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा मोठा प्रश्न होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

रेल्वेकडून मेगाब्लॉक मिळाल्यानंतर पत्रीपुलाचे गर्डरचे काम सुरू झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची कामे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विकासाच्या कामांनी वेग घेतला असून आम्ही राजकारण निवडणुकीपुरता करतो असे सांगत विरोधी पक्षाला टोला लगावला. पत्रीपुलावरून राजकारण झाले असले तरी आम्ही मात्र त्याचे राजकरण करणार नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

अनंत अडचणींवर मात करीत पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहचले आहे. मात्र येत्या महिन्याभरात या पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या २ वर्षांपासून पत्रीपुलाचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला आहे. लोकांनी दाखवलेल्या या संयमाचे कौतुक करत अनेक अडचणींवर मात करून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज पहिल्या टप्प्यातील काम झाले असून रविवारी दुसऱ्या टप्प्यातील काम देखील वेळेत पूर्ण होणार आहे. हा गर्डर खूप वजनदार कठीण होता. हा गर्डर बनविण्यासाठी महिने लागतात मात्र हैद्राबाद येथील ऋषी अग्रवाल यांनी हा गर्डर केवळ २ महिन्यात पूर्ण केला असून डिसेंबर अखेरपर्यंत या पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती दीपक मंगल यांनी दिली. तर हा गर्डर बनविणे हे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. वेळेची देखील कमतरता होती. लॉकडाऊन, पाउस आदी समस्यांमधून देखील आम्ही हे गर्डर हैद्राबाद मधून याठिकाणी आणून आज हे गर्डर लॉन्चिंगचे काम केले असल्याची माहिती ऋषी अग्रवाल यांनी दिली. यावेळी रिषभ मंगल आणि अशोक कुमार हे त्यांचे सहकारी उपस्थित होते.

दरम्यान काल पर्यंत पत्रीपूल आमच्या पाठपुराव्यामुळे होतोय, असे म्हणणाऱ्या मनसेने आज यू टर्न घेत इतर पुलांकडे लक्ष द्या, असे म्हणत उसने अवसान आणून टीका केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पत्री पूल होण्यास उशीर झाला हे सत्य असेल तरी त्यामागची प्रक्रिया सोपी आणि सहज शक्य होती असे म्हणणे जास्तच धाडसाचे ठरणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, कल्याण मनपा, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक प्रशासन आदी अनेक विभागांची मोट बांधून हे काम अखेर पूर्णत्वास आले. या कामासह सुरू असणाऱ्या कित्येक कामांवर फक्त टीका करण्याचे काम मनसे कडून होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *