अनोखे आणि प्रेरणादायी : आदिवासी उन्नती मंडळाची दिव्य साथ, शेलवली शाळेची लॉकडाऊनवर मात..!

| ठाणे / विशेष प्रतिनिधी | ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत येणारी शेलवली बांगर केंद्र अल्याणी ही शाळा शहापूर तालुक्यासह जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विख्यात असलेली शाळा.. शिष्यवृत्ती परीक्षा, NMMS परीक्षा, मंथन प्रज्ञाशोध परीक्षा अशा सर्व स्पर्धा परीक्षेत शाळेचा महाराष्ट्रभर लौकिक आहे. विविध गुणदर्शन स्पर्धेतही शाळा ठाणे जिल्ह्यात अव्वलस्थानी आलेली शाळा आहे. शाळेत पहिली ते आठवी पर्यंत वर्ग ,१४२ विद्यार्थी आणि ६ शिक्षक सेवारत आहेत. बाळू धानके हे शाळेच्या मुख्याध्यापक पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत.

दरम्यान, सर्वत्र कोरोनाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीनतेरा झाले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही. असला तरी तो पालकांकडे असतो तर कधी त्यात नेट बॅलन्स नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, अशा वेळेस गावातील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु हे चित्र निश्चितच समाधानकारक नव्हते.

अखेर शाळेतील शिक्षक डॉ. हरिश्चंद्र भोईर आणि सुधाकर पाटील यांनी आदिवासी उन्नती मंडळ मुंबई यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब पुरविण्याची विनंती केली. मंडळाचे समन्वयक श्री. रामचंद्र कशिवले यांनी आदिवासी उन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. राजुभाई शेठ यांच्याशी सल्लामसलत करून ६५ टॅब, कव्हर, हेडफोन, मेमरी कार्ड, अभ्यासक्रम, सिमकार्ड, राऊटर रिचार्ज यासाठी तब्बल ७ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य शाळेसाठी उपलब्ध करून दिले.

२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दैनिक सकाळ चे पत्रकार श्यामकांत पतंगराव आणि दैनिक पुढारीचे पत्रकार संतोष दवणे, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स पाळत टॅब वितरण सोहळा संपन्न झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. ६५ टॅब असले तरी दोन भावंडांना एक याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय झाली आहे.

सर्व विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध असलेली शेलवली बांगर ही ठाणे जिल्ह्यातील पहिली जिल्हा परिषद शाळा ठरली आहे. शिक्षकवृंद बाळू धानके, डॉ.हरिश्चंद्र भोईर, सुधाकर पाटील, सौ.रेखा पाटील, रामदास बांगर आणि हरी गावंडा यांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाचे नियोजन केले असून लगेचच विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे गिरवण्याची संधी मिळत असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी आदिवासी उन्नती मंडळाने शेलवली येथील ८० आदिवासी कुटुंबे आणि शेंद्रूण येथील ८० आदिवासी कुटुंबांना एक महिन्याच्या किराणा सामानाचेही वितरण करण्यात आले.

आदिवासी उन्नती मंडळाच्या विधायक उपक्रमाबाबत येथील जनतेने मंडळाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. सदर उपक्रमासाठी आदिवासी मंडळाचे डॉ. राजू शेठ आणि शहापूर तालुका समन्वयक रामचंद्र कशिवले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.