अन्वयार्थ : आई, बाप आणि.. खरा आतंकवाद !

आतंकवाद म्हटला की सर्वात आधी आपल्या नजरेसमोर येतो बाँब स्फोट ! नंतर त्या स्टेनगन्स्, धुवांधार गोळीबार, रक्तांच्या चिळकांड्या, मासाचे चिथडे, शरीराचे विखुरलेले अवयव, विक्राळ आग आणि आसमंत व्यापून बसलेला धूर..! चेहरे झाकून हातात बंदुका घेतलेली माणसं म्हणजेच आतंकवादी.. अशी आपली भाबडी समजूत असते !

पण खरा आतंकवाद वेगळा असतो. ह्या बंदूकवाल्या आतंकवादापेक्षा तो जास्त भयंकर असतो. घातक असतो. पहिल्या आतंकवादी प्रकारात मोजके काही आतंकवादी चोरून लपून येतात, हमला करतात, पळून जातात किंवा स्वतःही मरून जातात ! दुसऱ्या प्रकारातले आतंकवादी बहुधा आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत, पण आपल्या अवतीभवती असतात. ते पळूनही जात नाहीत. उलट आणखी जवळ येतात. परिवारात घुसतात. आपलेच असल्यासारखे भासतात. पण ते पहिल्या लोकांपेक्षा जास्त खतरनाक असतात.

बॉम्बस्फोट झाला की जो समोर येईल तो मारला जातो. बॉम्ब काही कुणाचं आधारकार्ड बघून जीव घेत नसतो. दुसऱ्या प्रकारचा आतंकवाद हा निवडून निवडून आपला प्रभाव दाखवतो. हा मोठ्यांच्या समोर शेपटी टाकतो. एकीकडे त्यांचे जोडे सुद्धा उचलतो.. आणि दुसरीकडे सामान्य माणसाला टार्गेट करतो. गरीब माणसावर दादागिरी दाखवतो.

महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख, कधी मूर्तीची विटंबना आणि त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या जाण्याचे प्रकार तर मधे मधे सुरूच असतात. सोशल मीडियातून अशी दटावणी करणारे भक्त किंवा सैनिक चोवीस तास तत्पर असतात. मग ती कुणी विदुषी असो की एखादी तरुण मुलगी असो, सामान्य व्यक्ती असो, की कलाकार..तिच्यावर घसरताना आपल्यालाही आई – बहीण असू शकते हे देखील आपण थेट विसरून जातो.

अलीकडेच गणपती आणि घटना प्रकरण बरंच गाजलं ! त्या कलाकाराच्या ( तो लेखक सुद्धा आहे असं वाचलं.. तो उच्चवर्णीय सुद्धा आहे असंही वाचण्यात आलं.. अर्थात त्याच्या डोक्यात जे काही होतं, ते चूकच होतं.. ) बाबतीत फार मोठी प्रतिक्रिया उमटली. मागील वर्षी अशीच दुसऱ्या एका लोकप्रिय विनोदी कलाकाराच्या बाबतीत घटना घडली. मात्र तो मागासवर्गीय होता. त्याचा गुन्हा एवढाच की त्यानं आपल्या घरी गणपतीची स्थापना केली. आणि तेवढ्यावरून काही लोक भडकले. त्याला प्रचंड त्रास झाला. बिचाऱ्याला केविलवाणं होऊन माफी मागावी लागली होती. गम्मत अशी की या दोघांनीही आपलं करीयर करतांना एखाद्या महापुरुषाच्या नावाचा फायदा घेतला असण्याची शक्यता जवळपास नाहीच !

मात्र त्याचवेळी ज्यांनी महापुरुषांच्या नावाचा बाजार मांडत मांडत आपलं सारं करीयर उभं केलं.. आणि कुणी तर त्यांचं सरळ नातं किंवा नाव वापरत वापरत मोठे झालेत..आणि राजरोसपणे सत्तेसाठी लाचारही झालेत, त्याचं काय ? अजूनही ते सत्ताधाऱ्यांचे पाय चेपण्यात धन्यता मानत असतील, त्याचं काय ? त्यांच्याबद्दल त्या त्या महापुरुषांच्या भक्तांची भूमिका मात्र नेमकी बोटचेपी का असते ?

लादेन यानं अमेरिकेवर केलेल्या विमान हल्ल्यात जे समोर होते ते सारेच मेलेत. पण दुसऱ्या प्रकारच्या हमल्यात मात्र सामान्य माणसं आयुष्यभर मरत असतात. कायम दहशतीखाली जगत असतात. महापुरुषांचं नाव घेवून उभारण्यात येणाऱ्या स्मारकामध्ये होणारा भ्रष्टाचार या तथाकथित भक्तांना माहीत नसतो का ? हे तिथं का चूप बसतात ? त्यामुळे त्या महापुरुषांची विटंबना होत नाही का ? संताप नेमका कशाचा यायला हवा, हेही आपल्याला कळत नसेल, तर आपण खरंच माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे आहोत का ? महापुरुषांचे नाव घेण्याची खरंच आपली लायकी आहे का ?

पहिल्या प्रकारच्या आतंकवादापेक्षा दुसऱ्या प्रकारचा आतंकवाद जास्त संघटित असतो. समाजात खोलवर रुजत असतो. तो कधी समाजसेवेचा बुरखा पांघरून काम करतो, कधी राष्ट्रवादाचा उदो उदो करतो, तर कधी महापुरुषांच्या नावाचा उपयोग करून धुडगूस घालत असतो ! माणूस हाच त्याचा दुश्मन असतो. समता, मानवता ह्यांचा त्याला साधा विचारही सहन होत नाही. मात्र तरीही तो सोयीप्रमाणे वेगवेगळे बुरखे पांघरत असतो. खरं तर अशा संघटना म्हणजे मानसिक विकृत लोकांचे कळप असतात. एकवेळ पिसाळलेल्या जनावरांचा इलाज होऊ शकतो, पण यांचा इलाज म्हणजे महाकठीण काम ! अर्थात धर्म, जात, पात, प्रांत, भाषा कोणतीही असो, असल्या विकृत लोकांची संख्या मोजकीच असते. पण त्यातले बाकीचे मुग गिळून चूप बसण्याचं पाप करत असतात आणि मग साऱ्या समूहाला आतंकवादी समजण्यासाठी आयतच कोलीत इतर लोकांच्या हाती पडते..! साऱ्या समाजाला त्याच्या झळा सोसाव्या लागतात !

ऐकायला जरा कठीण वाटेल, पण ओबीसी समाज हा सद्या ऐतखाऊ मोड मध्ये स्थिर झाला आहे. इतरांनी चळवळी कराव्या, आंदोलनं करावी, आणि याला आयते फायदे फुकटात मिळावे, अशी याची मानसिकता झाली आहे ! यात शेतकरी, कष्टकरी लोकांना आपण सोडून देवू. त्यांना त्यांचे रोजचे प्रश्नच जगू देत नाहीत, तर सामाजिक बांधिलकी वगैरे गोष्टी फार दूरच्या आहेत. मुख्य मुद्दा मध्यमवर्गीय ओबीसी – बहुजनांचा आहे. जे थोडे फार वैचारिक वगैरे झालेले दिसतात, त्यातले बहुसंख्य लोक एकांगी आहेत. कळत नकळत आतंकवादाच्या बाजूने झुकले आहेत, असं चित्र हल्ली दिसायला लागलं आहे.

दुसऱ्या प्रकारचा आतंकवाद हा आता आपल्या चुलीपर्यंत आला आहे. ओबीसी समाज हा ५२ टक्के आहे. पण या आतंकवादाचा फटका त्याला ९० टक्के बसणार आहे. सर्वात आधी हमला त्याच्यावरच होणार आहे. कारण तो आजही आतंकवाद्यांच्या उष्ट्या चड्ड्यांनाच रुमाल म्हणून अभिमानानं वापरतो..! त्यांच्या चड्ड्या म्हणजे यांचे झेंडे..! पण याची त्यांना जराही लाज वाटत नाही. उलट यांचे झेंडे अंधरामध्ये त्यांच्या काय काय पुसण्याच्या कामी येत असतील, याची कल्पनाही न केलेली बरी !

असे ओबीसी, मागासवर्गीय नेते हेच या छुप्या आतंकवादाचे वाहक आहेत. दलाल आहेत. यांच्यापासून ओबीसी, बहुजन समाजानं ‘पॉलिटिकल डिस्टंसिंग’ पाळायला हवं ! ती काळाची गरज आहे ! जे लुटारू आपलं शेत लुटण्यात सहभागी आहेत, त्यांनाच आपण घरी बोलावून पुरणपोळी खाऊ घालण्यात धन्यता मानत आहोत ! त्यांच्या सोबतचे फोटो अभिमानानं व्हायरल करत आहात ! आमचा राजा, आमचा नेता, आमचा दादा, आमचा उद्धारकर्ता म्हणून होर्डिंग लावत आहात !

अलीकडच्या काही वर्षांपासून हा देश तसाही आपल्या हातातून निसटल्यासारखाच आहे. पण तरीही मानवतावादी संतांच्या शिकवणीमुळं भारतीय समाजाची मुळं घट्ट आहेत.. म्हणून अजून तग धरून आहे. समोरची फक्त तीन वर्ष आपल्या हातात आहेत. हा देश कायमचा हातातून जाऊ नये, असं वाटत असेल, तर आधी आपल्याला शुद्धीवर यावं लागेल. सामाजिक चळवळीतल्या लोकांना आपली एककल्ली भूमिका सोडावी लागेल. हजारो वर्षांपूर्वीचं रामायण, महाभारत, वेद, पुराण यांची चिकित्सा जरा सद्या बाजूला ठेवून गेल्या सत्तर – ऐंशी वर्षातील महाभारत समजून घ्यावं लागेल. त्यातील दुर्योधन, दुःशासन, शकुनी जसे समजून घ्यावे लागतील, तसेच छुपे भीष्म आणि द्रोण देखील समजून घ्यावे लागतील. देशाच्या रथाचं चाक ज्या भयंकर दलदलित फसलं आहे, त्यातून बाहेर काढण्यासाठी राजकीय आणि व्यावहारिक नियोजन करावं लागेल. चळवळ वेगळी आणि राजकीय व्यवहार वेगळे, हे समजून घ्यावं लागेल. मुख्यतः आपापले इगो बाजूला ठेवावे लागतील. आत्यंतिक आदर्शवाद हा व्यवहारात फारसा उपयोगाचा नसतो, हे सूत्र आधी समजून घ्यावं लागेल.

चळवळ ही एखाद्या हळव्या आई सारखी असते. तिला प्रामाणिकपणे वाटत असते, की माझ्या मुलाला पोटभर खायला मिळावं, चांगलं शिक्षण मिळावं, अंगभर कपडे मिळावेत..! त्यात चुकीचं काहीही नाही. पण राजकीय सत्ता, ही कारभारी बापासारखी असते. त्याच्याही मनात मुलाबद्दल आई सारखीच भावना असली, तरी खिशात मात्र तेवढे पैसे नसतात. येण्याची शक्यताही नसते. आणि म्हणून मग शक्य असेल तो सुवर्णमध्य साधून, व्यावहारिक नियोजन करत करत बापाला पुढं जावं लागते. अशावेळी शहाणी आई समजून घेते, मुलाचीही समजूत घालते. बापाच्या छातीवरील दगड बाजूला करते. त्याला हिम्मत देते. वेळप्रसंगी नवऱ्याची माय होऊन त्याचा मुका आक्रोश नव्या ऊर्जेत बदलण्याचं काम करते ! आम्हाला अशा चळवळी हव्या आहेत !

पण एखादी आई नुसतं आकांड तांडव करत बसली तर ? शेजारच्या पोरांशी तुलना करत बसली तर ? माझ्या पोरांना तुम्ही दोन कपडे पण ढंगाचे देवू शकत नाही, म्हणून बापाचा पाणउतारा करत बसली तर ?

बाप जर दारुडा असेल, जुगारी असेल, कामचोर असेल तर त्याला आईनं चपलेनं बडवायलाही हरकत नाही. पण सारं आयुष्य प्रामाणिकपणे कुटुंबासाठी झोकून देणाऱ्या बापाच्या मागेही एखादी आई उभी रहात नसेल, त्याच्याकडे उठता बसता संशयाने बघत असेल, तर ती आई नक्कीच विकृत आहे, मानसिक बिमार आहे, हे आपण समजून घ्यायला हवं. आमच्या चळवळीतील नेतृत्व असं आक्रस्ताळेपणा करणारं असणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे.

माझी एक विनंती आहे..
• सामाजिक चळवळीतल्या लोकांनी प्रामाणिक आत्मचिंतन करावं की, आपण कोणत्या प्रकारची आई होणार आहोत ?
• किंवा जर नवराच दारुडा असेल, तिथं कमरेला पदर खोचून आपल्या पोरांचा बाप होण्याची भूमिका पार पाडणार आहोत का..?
• की केवळ नवरा दारुडा आहे, माझं नशीबच फुटकं निघालं.. म्हणून नुसत्या बांगड्या फोडून घेण्यात पराक्रम मानून खुश होणार आहोत ?

काळ कुणासाठीही थांबत नाही. आत्मचिंतन करू या ! झटपट निर्णय घेवू या ! सकारात्मक निर्णय घेवू या !

( #समतावादी हिंदू धर्म आणि नवा भारत.. या आगामी पुस्तकातील मुक्त चिंतनातून..)

– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *