अन्वयार्थ : माधुरी दीक्षित, सावजी मसाले आणि शहाजहान !

व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी मुळे अनेक मौलिक शोध लागत आहेत. त्यातलाच एक शोध नुकताच वाचण्यात आला. त्याप्रमाणे ताजमहाल हा मूळ भोईर नावाच्या माणसाच्या मालकीच्या जमीनीवर बांधला आहे. शहाजहाननं ती जागा हडप केली. एवढीच त्रोटक माहिती त्यात आहे. पण नंतरचा सर्व इतिहास मला माहीत आहे. कोरोना मुळे सारेच हात हलवत घरी बसल्यामुळे तो इतिहास जाहीर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते.

ती जागा हडप केल्यानंतर शहाजहान बादशहाने आपल्या नाथा भाऊंना गाठलं. आणि भाऊंच्या सल्ल्याप्रमाणे जागेचा सातबारा आपल्या बायकोच्या नावावर करून घेतला. ज्यांची जागा हडपली त्या भोईर, म्हात्रे, पाटील या लोकांना मस्त बीअर वगैरे पाजली. झकास पार्टी पण दिली. ही सारी मंडळी आग्री समाजाची होती. ‘आम्ही जागा देतो पण त्या बिल्डिंगला आमचे नाव द्या,’ अशी त्यांनी अट घातली. शहाजहान त्याला तयार झाला आणि म्हणून त्याला आग्र्याचा ताजमहाल असे म्हणतात !

वरील दावा शंभर टक्के खरा असून हे मी जन्मो जन्मी आणि हजारो वर्षांपासून बोलत आलो आहे. ताजमहाल लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं माझ्या मुलाखती टीव्ही वाल्यांनी त्यावेळी घेतल्या होत्या. त्या युट्यूब वर आताही उपलब्ध आहेत. असो.

पण या विषयाशी संबंधित आणखीही महत्वाची माहिती माझ्याकडे पुराव्यासहित आहे ! शहाजहाननं ताजमहाल आपल्या बायकोच्या प्रेमासाठी बांधला, हे सर्वांना माहीतच आहे. पण मुळात मुमताजचं नाव माधुरी दीक्षित होतं, हे किती लोकांना माहीत आहे ? ती नागपूरला लेंडी तलावाच्या बाजूला राहायची. तिला सावजी चिकन छान बनवता येत होतं. एकदिवस ही बातमी शहाजहानच्या कानावर गेली. आणि त्यानं तिला पळवून नेलं. आपल्या सर्व बायका मुस्लिम असून देखील त्यांना चिकन बनवता येत नाही, आपल्याला पातळ बेसन खाऊन दिवस काढावे लागतात, हे जनतेला माहीत झाल्यास आपली बदनामी होईल, म्हणून त्यानं मग माधुरीचं नाव, मुमताज असं केलं.. त्यावरून मुमताज महल..आणि पुढे ताज महल.. असं झालं ! ( त्यासाठी रातोरात न्यायालयासमोर अॅफिडेवीट देखील करण्यात आलं. या कामी मदत केली म्हणूनच नागपूरच्या न्यायमुर्तींना सर्वात उंच खुर्चीवर बसवण्याचा हट्ट माधुरीनं शहाजहान कडे केला. नेमक्या वेळी कोंडी होऊ नये म्हणून, त्यानंही तो मुकाट्यानं मान्य केला. शिवाय लाखो रुपये किमतीच्या बाईकवर बसण्याची न्यायमूर्तींची इच्छा सुद्धा पूर्ण करण्यात आली. पुढे या प्रकरणी काडी केल्यामुळे अॅड. प्रशांत भूषण यांच्यावर मानहानीचा दावा सुद्धा दाखल झाला. त्यांना १ रुपयाचा ऐतिहासिक दंड पण करण्यात आला. याचे ढेर सारे पुरावे न्यायालयात उपलब्ध आहेत.. किंवा महाल भागात हे किस्से कुणालाही विचारता येतील )

महल हा शब्द मराठी मधील महाल या शब्दाला समानार्थी आहे. ( संदर्भ : जगातला कोणताही हिंदी, मराठी, उर्दू शब्दकोश पाहू शकता ) आणि नागपूर मध्ये महाल एरिया फेमस आहे. तिथंच मसाले संघाचे मुख्यालय आहे. चंद्र, सूर्य, तारे अस्तित्वात नव्हते, तेव्हाही हा मसाले संघ होता. स्वर्गामधले झाडून सारे तेहतीस कोटी याच संघाचे स्वयंसेवक होते. चड्डी घालून शाखेत जायचे. शाखा हाच त्यांचा स्वर्ग होता.

स्वर्गामधल्या तेहतिस कोटींच्या सर्व बायका बयताड होत्या. ( यासाठी वेगळे पुरावे देण्याची गरज नाही..) त्यांना स्वयंपाक येत नव्हता. म्हणजे.. सावजी चिकन येण्याचा प्रश्नच नाही. बिचारे स्वर्गातील देव मॅगी ( झाडाच्या उकडलेल्या मुळ्या.. ) खाऊन आणि सोमरस (.. म्हणजे देशी दारू ) पिवून जगायचे ! स्वर्गात कामधंदा वगैरे काहीही नव्हता. बहुतेक रिकामचोट होते ! कवडीचे उत्पन्न होत नव्हते. एक दिवस स्वर्गाचा जिडीपी थेट मायनस २४ पर्यंत घसरला.. आणि शेवटी प्रधान सेवकाची नशा उतरली. मग त्याने इंद्राणीला ( म्हणजे स्वतःच्या बायकोला.. ) एका बँकेत कर्मचारी म्हणून चिकटवून दिले. ती मोठी कलाकार पण होती. लोक छातीवर दगड ठेवून तिचं गाणं ऐकायचे !

माधुरी दीक्षित मात्र सुगरण होती. मसाले कसे वाटायचे हे तिला मस्त जमायचे. त्याचीच दीक्षा माधुरीनंच नागपूरच्या साऱ्या सावजी लोकांना दिली. तेव्हापासूनच तिचं आडनाव दीक्षित असं पडलं. ( पूर्वीच्या काळी आडनाव व्यवसाय किंवा कामावरून पडायचे, याचे अनेक पुरावे समाजशास्त्रीय ग्रंथात उपलब्ध आहेत. खाज असेल त्यांनी बघून घ्यावे ) थोडक्यात सावजी चिकनचा शोध माधुरी दीक्षितनं लावला हा इतिहास आहे. आणि असाच एक दिवस तिच्या मसाल्याचा सुगंध शहाजहान पर्यंत पोचला !

या बाबतचे सारे पुरावे माहिती अधिकारात आपल्याला केव्हाही मिळू शकतील. पैसे भरण्याची हिम्मत असेल त्यांनीच समोर यावं. अन्यथा चूप बसावं..!

नागपूरच्या मसाले शाखा फार प्रसिद्ध आहेत. नुसत्या हवेत काठ्या हलवून शत्रूला पळवून लावण्याचं हे युद्धशास्त्र जगात कुणाकडेही नाही ! एकदा माधुरी दीक्षित अचानक शाखेवर गेली होती. ‘धक धक करने लगा..’ ह्या गाण्याचं प्रमोशन करण्याची तिला हुकी आली. त्यावर ती धमाल नाचली. तिचा तो डान्स बघून आपलं ब्रह्मचर्य व्यर्थ गेल्याची जाणीव शाखेतील सेवकांना प्रकर्षाने झाली. पुढच्या अनेक रात्री सेवकांना झोप आली नाही. ( शिवाय आणखी बरंच काही घडून गेलं..पण उगाच कुणाच्या जखमेवर मीठ चोळणं हे सभ्यपणात बसत नाही आणि शेवटी मी पण नागपूरवाला आहे, तेव्हा आपल्या लोकांना आपणच सांभाळून घ्यायला हवं ! ) माधुरीचे मसाले पाहिल्यामुळे, आयुष्यभर आपली अशीच कुचंबणा होऊ नये, आपली राष्ट्रीय संपत्ती वाया जाऊ नये, म्हणून मग मुख्यालयावर गुप्त बैठक घेण्यात आली. गंजत असलेला शस्त्रसाठा व्यर्थ जावू नये या उदात्त हेतूनं नवी निती आखण्यात आली. आणि तेव्हापासून शाखेत शस्त्रपूजा सुरू झाली. प्रमोदजी, गोपीनाथजी आणि संजयजी सिडी वाले.. हे या मोहिमेचे सेनापती होते. सर्वांचे प्रयोग सदैव सुरूच असायचे. त्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी आपल्या स्वतंत्र प्रयोगशाळा स्थापन केल्या होत्या. पण संजयजी यांचे प्रयोग सुरू असतांनाच एकदा कुणीतरी लाईव्ह प्रयोग सीडी मध्ये पकडला आणि मग असल्या प्रयोगावर संघाने बंदी आणली.

मात्र नरेंद्र भाई ५६ इंचवाले, यांच्या उदयाबरोबर ह्या छुप्या प्रयोगशाळा पुन्हा राजरोस सुरू करण्यात आल्यात. त्यांना कॅबिनेट दर्जा पण देण्यात आला. अशाच एका नव्या प्रयोगशाळेची उभारणी हिमाचल प्रदेशातून करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जमीन ताब्यात घेण्यात आलेली आहे. भूमिपूजन लौकरच योग्य मुहूर्तावर करण्यात येईल. तोपर्यंत वाट बघू या..!

तोपर्यंत रिलॅक्स रहा..! दिलखुलास हसा ! काळजी घ्या !

– ज्ञानेश वाकुडकर, नागपूर ( अतिथी संपादक )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *