अन्वयार्थ : संघटना, नेता , कार्यकर्ता आणि लखोबा..!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे. ते म्हणतात,

“हत्तीस आवरी गवती दोर !
मुंग्याही सर्पास करती जर्जर !!
रानकुत्रे संघटोनी हुशार !
व्याघ्रसिंहासी फाडती !!

यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे असे म्हणतात. समाजात (समूह) राहूनच मानवाचा सर्वांगीण विकास होत असतो. त्याच्या व्यक्तीमत्वाला विविध कंगोरे फुटून त्याचे व्यक्तिमत्त्व बहरत असते. जो माणूस समाशील नसतो तो कितीही बुद्धिवान, श्रीमंत असला तरी एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे समाजाला त्याचा उपयोग होत नाही. म्हणूनच प्रत्येकाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.

जी जी व्यक्ती कोणत्या तरी संघटनेसोबत जोडलेली असते त्या त्या व्यक्तींना लोक आपुलकीने ओळखत असतात. इतरांपेक्षा जास्त मानसन्मान मिळत असतो. काही व्यक्ती संघटनेत खूप ‘Active’ असतात. त्यांना जास्त प्रसिध्दी मिळते. संघटना जर काळानुरुप मोठी होत गेली, नावलौकीकास आली तर आपोआपच कार्यकर्त्यांचेही नाव व्हायला लागते. त्यांना प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पद, पत, मिळायला लागते. काही लोकांच्या डोक्यात मग या प्रसिद्धी व पैश्याची हवा चढायला लागते. ते स्वतःला संघटनेपेक्षा मोठे समजायला लागतात. त्यांच्यात प्रचंड अहंकार निर्माण होतो. माझ्यामुळेच ही संघटना आहे असे त्याला वाटू लागते. मीच या संघटनेला मोठे केले असा अहंगंड त्याच्यात निर्माण होतो. मग त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, चालणे पूर्णपणे बदलून जाते.

ज्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावर आणि श्रमावर तो “मोठा” झालेला असतो त्यांनाच तो तुच्छ समजायला लागतो. त्यांच्यासोबत बोलायला त्याला आता वेळ नसतो. त्यांचे फोन उचलण्यात त्याला कमीपणा वाटतो. आता त्याचे “attitude” पूर्णतः बदललेले असते. आणि इथूनच मग त्याच्या -हासाला सुरुवात होते. जगातील कोणत्याही संघटनेच्या व कार्यकर्त्यांच्या बाबतीत हे असेच घडत असते. संघटनेत काही वक्ते, लेखक, प्रचारक असतात. त्यांच्या माध्यमातून संघटनेची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहचवायची असतात. वक्ते, लेखक हे संघटनेचे वैभव असतात. परंतु कार्यकर्ता मात्र संघटनेचा प्राण असतो, आत्मा असतो. त्यामुळे “या” मंडळींपेक्षा कार्यकर्ता अत्यंत महत्वाचा असतो. म्हणून एखादा वक्ता किंवा लेखक याला विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त महत्व देवू नये. सर्वांना महत्व दिले गेले पाहिजे. नाहीतर “ही” मंडळी डोक्यावर चढतात आणि स्वतःला संघटनेपेक्षा मोठी समजायला लागतात. मग आता त्या व्यक्तीची महत्वाकांक्षा प्रचंड वाढायला लागते. तो आता मर्यादेच्या पलिकडेचे स्वप्न पाहतो आणि आता आपण या संघटनेतून बाहेर पडलो तर ही संघटनाच संपून जाईल असा त्याचा भ्रम होतो. मग तो संघटनेच्या विरुध्द कारवाया करायला लागतो, बोलायला लागतो, कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न करतो, कार्यकर्त्यांना नेतृत्वाविरुध्द खोटेनाटे सांगतो आणि संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतो.

परंतु कार्यकर्ते हुशार आणि निष्ठावंत असल्यामुळे त्याच्या कारस्थानाला बळी पडत नाही. उलट कार्यकर्ते त्यालाच जाब विचारतात. संघटनेने मोठे केले नसते तर तुला गावाच्या बाहेर कोणीही ओळखले नसते, असे त्याला अधिकारवाणीने सांगतात. आतापर्यंत सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली इज्जत “zero” होवून जाते. मागे वळून पाहिल्यावर त्याच्यामागे कोणीच दिसत नाही. मग त्याचे डोळे उघडतात ,पश्चात्ताप होतो, संघटनेचे महत्व समजते. आपल्यामुळे संघटना नाही तर संघटनेमुळे आपण होतो याची त्याला जाणीव होते. पण आता वेळ निघून गेलेली असते.

काही क्षणासाठी मोठे लोक सोबत असतात पण आपले संरक्षण करणारा, आपल्यासाठी जीव देणारा कोणीच जीवाभावाचा सामान्य कार्यकर्ता मात्र आपल्यासोबत नाही याची त्याला काही झाल्यावर त्याची रात्रीची झोप हराम होते. तो एकाकी पडतो. पैसे कितीही मिळाले तरी कार्यकर्त्यांचे प्रेम आणि आपुलकी मात्र त्याला कधीच मिळू शकत नाही.

पण जो कार्यकर्ता संघटनेसोबत प्रामाणिक असतो त्याला त्याचे फळ एक दिवस निश्चितच मिळते. “फितुर” म्हणून त्याला कोणीही हिणवत नाही. प्रामाणिक म्हणूनच सर्वजण त्याच्याकडे पाहतात. म्हणून कोणत्याही संघटनेत काम करणा-या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेसोबत एकनिष्ठ राहावे. संघटनेत रुसवे, फुगवे, नाराजी, वादविवाद चालतच असतात. पण ज्या संघटनेमुळे आपल्याला “सर्वकाही” मिळाले त्याच्यासोबत मात्र कधीच धोकेबाजी करु नये. नाहीतर इतिहासात “लखोबा” म्हणून आपली नोंद होते..

– नदीम पटेल ( लेखक जुनी पेन्शन हक्क संघटनचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *