अन्वयार्थ : अविनाशा, चुकलास रे..!

सध्या ठाणे आणि परिसरात अविनाश जाधव हे नाव प्रकाश झोतात येताना दिसत आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष असणारे अविनाश जाधव आपल्या आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. वेगवेगळे उपक्रम राबवत त्यांनी आपला एक वेगळा ठसा उमटविण्याची प्रयत्न केला आहे, हे नक्की. ते मनसेचे आमदारकीचे उमेदवार देखील होते. तसे मनसे म्हणजे खळ खट्याक.. त्यात अविनाश जाधव आक्रमक, त्यामुळे हे समीकरण भलतचं गरम..!

आपल्या आक्रमक स्वभावाने त्यांनी अनेक प्रश्न मार्गी देखील लावले, हे खरे परंतु याला काही प्रमाणात मर्यादा असाव्यात हे मात्र ते वसई विरार महापालिका प्रकरणात विसरले. आयुक्तांना आई बहिणी वरून अश्लील शिवीगाळ केल्याने त्यांना वसई विरार पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. त्यात कोरोना काळात त्यांनी ठाणे मनपा प्रशासनाला वेठीस धरले आणि अयोग्य वेळी प्रत्यक्ष आंदोलन करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. यावरून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

राजकारणात आक्रमक स्वभाव हा तसा लोकांना आकर्षित करणारा.. तरुणांचा ओढा त्या व्यक्तीकडे वाढवणारा, परंतु याचा अर्थ त्या मर्यादा आपण सोडल्या पाहिजेत असा अजिबात होत नाही. आक्रमक परंतु सुसंस्कृत असणे हे सध्याच्या काळात महत्वाचे आहे. मतदार, नागरिक हे अश्या लोकांसोबत नेहमी उभे असतात. दुसऱ्यांची आई बहीण काढल्याने तुम्ही खूप धुरंदर किंवा आक्रमक होत नसता. उलट तुम्ही अगदीच सुमार दर्जाचे आहात, यावर शिक्कमोर्तब होत असते. प्रश्न असतील, कदाचित प्रसिध्दी पेक्षा प्रश्न सोडविण्याची आवड देखील असेल परंतु त्याची दिशा योग्य हवी.

आयुक्तांना अश्लील भाषेत शिव्या देण्याचे समर्थन तुमचे शीर्ष नेतृत्व देखील करणार नाही. ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे, तिथे अश्या थेरांना कितपत खपवून घेतले जाईल, हाही प्रश्न आहेच. फक्त प्रसिद्धीसाठी मारझोड केल्याने, शिव्या दिल्याने सोशल मीडियावर समर्थन करणाऱ्यांची संख्या जरूर वाढेल, परंतु साध्य काय होईल, हे ही कोणी सांगू शकणार नाही. त्यामुळे अविनाश जाधव यांनी प्रसिद्धीसाठी केलेला हा निव्वळ स्टंट तर नाही ना, असा तर्क वितर्क राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. तर ठाणे मनपा आंदोलन व अटक प्रकरणावर महापौर नरेश म्हस्के यांनी सविस्तर बाजू ठाणेकरांसमोर आणल्याने त्या आंदोलनातील फोलपणा देखील समोर आला आहे. त्यामुळं काही कामे चांगली असून देखील या प्रकरणामुळे अविनाश चुकला हे म्हणणे योग्य ठरेल.

– राम प्रधान, नौपाडा, ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *