अबब..! ४ थी तून थेट ६ वीत प्रवेश, प्रितम नवनाथ धांडोरे याचे यश..!

| सोलापूर | सध्याच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळा गुणवत्तेत कुठेही कमी नाहीत. याचा प्रत्यय नुकताच आला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघडोहवस्ती शाळेचा विद्यार्थी प्रितम नवनाथ धांडोरे याने अखिल भारतीय सैनिक स्कूल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून इयत्ता ४ थी तुन थेट ६ वीत प्रवेश मिळवून सर्वात कमी वयात यश मिळवणारा विद्यार्थी ठरला आहे.

सातारा सैनिक स्कूल देशातील पहिले सैनिक स्कूल आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशसंरक्षणासाठी सैन्यदलात सक्षम व कर्तृत्ववान अधिकारी तयार करण्यासाठी संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात एक या प्रमाणे सैनिक स्कूलची स्थापना केली गेली. याच सैनिक स्कूल मधून देशाला अनेक कर्तृत्ववान अधिकारी मिळाले, फक्त सैन्य दलालाच नाही तर कित्येक प्रशासकीय अधिकारी सुद्धा सातारा सैनिक स्कूलने दिले आहेत.

सैनिक स्कूल हुशार, बुद्धीमान मुले स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवडून, त्या मुलांना स्पर्धात्मक शिक्षण देवून, त्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या पण खंबीर बनवते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पण ही मुले तावून सुलाखून सुखरूप बाहेर येतील याप्रमाणे त्यांना प्रशिक्षित करते.

आज सातारा सैनिक स्कूल मधून शिक्षण घेवून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी सैन्यदलात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत आहेत, त्याचप्रमाणे समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुद्धा कित्येक अधिकारी आपला ठसा उमटवत आहेत.

प्रितम धांडोरे यास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघडोहवस्ती च्या मुख्याध्यापक प्रिया तोरणे, वर्गशिक्षीका राबिया शेख, प्रज्ञादिप अकेडमी चे नागेश नरळे, ललिता नरळे, महालक्ष्मी शिक्षण संकुल चे प्रशांत मदने यांचे मार्गदर्शन झाले. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. प्रीतमचे वडील नवनाथ धांडोरे हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत.

✓ ” ग्रामीण भागातील मुले सातारा सैनिक शाळा सारख्या अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा प्रयत्न केल्यास यशस्वी होऊ शकतात. मला एन. डी. ए. त जावून देशसेवा करायची आहे.” – प्रितम धांडोरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *