अमरावती शिक्षक मतदारसंघ : जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पाठिंब्याने शेखर भोयर यांचे पारडे जड, श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे आणि शेखर भोयर यांच्यात होणार खरी तिरंगी लढत..!

| अमरावती | कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल निवडणूक आयोगाने फुंकले आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे, शिक्षक महासंघाचे शेखर भोयर यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे. मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शेळके यांच्याकडून आव्हान मिळाले होते.

श्रीकांत देशपांडे यांनी अरुण शेळके यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता शिवसेना-भाजप वेगवेगळ्या निवडणुका लढवीत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नासाठी शेखर भोयर सातत्याने काम करताना दिसत आहेत. त्यात शेखर भोयर यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांचा अधिकचा फायदा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात श्रीकांत देशपांडे यांच्याबद्दल मात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर त्यांच्या कार्यकाळात दिसून आला.

शेखर भोयर हेसुद्धा शिक्षक महासंघाकडून निवडणूक लढवत आहेत. शेखर भोयर हे मागील निवडणुकीत पराभूत झाले असूनही त्यांनी काम सुरुच ठेवले. त्यामुळे मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे हे निष्क्रिय असल्याचा आरोप भोयर यांनी केला. तर शिक्षण संघर्ष समितीचे वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम :

✓ नामनिर्देशन पत्र – गुरुवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत भरता येणार आहे.
✓ नामनिर्देशन पत्रांची छाननी – शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे.
✓ नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे
✓ विभागात एकूण मतदान केंद्र : 77
✓ अमरावती शिक्षक मतदारसंघात 5 जिल्हे येतात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा
✓ जिल्हानिहाय मतदार
अमरावती : 10,088
अकोला : 6,000
बुलडाणा : 7,422
वाशिम : 3,773
यवतमाळ : 7,407
एकूण : 34,690 मतदार

Leave a Reply

Your email address will not be published.