अयोध्येत बौद्ध विहार व्हावे, या आनंद शिंदे यांच्या मागणीला आठवलेंचा पाठिंबा

| मुंबई | गायक आनंद शिंदे यांच्या मागणीच्या आधीपासूनच मी अयोध्येत बौद्ध विहार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अयोध्येत राम मंदीर होत आहे. मशिद देखील व्हायला हवी आणि बौद्ध विहार देखील व्हायला हवे. यासाठी मी स्वत: लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहे. तसेच त्याठिकाणी एका ट्रस्टची स्थापना करून तीस एकर जागा खरेदी करणार आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध विहार बांधणार आहे. कारण त्याठिकाणी राम मंदिराच्या आधीदेखील बौद्ध विहार होते. त्याचे अवशेष देखील मिळाले आहेत. त्यामुळे भव्य बौद्ध विहार करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती खासदार रामदास आठवले यांनी दिली आहे.

आठवले म्हणाले, यासाठी लवकरच एका ट्रस्टची स्थापना करणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून जमीन खरेदी करण्यात येईल. येत्या काळात अयोध्येत राम मंदिरासोबतच बौद्ध विहार देखील अयोध्येत येणा-या भाविकांना पाहिला मिळणार आहे. गायक आनंद शिंदेनी या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे अशी माहिती मला मिळाली आहे. आनंद शिंदे यांनी यामध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. सध्याची परिस्थिती पाहता सगळे नेते एकत्र येणार नाहीत. शिवाय मी देखील त्यांच्यासोबत जाणार नाही. बौद्ध विहार बांधण्यासाठी माझे प्रयत्न मी सुरु ठेवणार आहे.

दरम्यान आगामी राम मंदिर उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपने आमंत्रण द्यायला हवे असे वाटते का ? या प्रश्नावर बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर व्हावे यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ५ ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी देशातील अनेक मुख्यमंत्र्याना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जावे. त्यांना देखील लवकरच नक्कीच आमंत्रण येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *