अशी आहे रामजन्मभूमी पूजन कार्यक्रमाची पत्रिका..!

| मुंबई | अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाच्या अतिथींना आमंत्रणे पाठविली गेली आहेत. अयोध्या प्रकरणात सहभागी असलेले इक्बाल अन्सारी यांनाही भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पाठविण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत संघाचे प्रमुख मोहन भागवत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख पाहुणे असतील.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पाठवलेल्या या आमंत्रण पत्रिकेत असे लिहिले आहे की, श्री राम जन्मभूमी मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातून होणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील राममंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात उपस्थित असतील. विशेष म्हणजे राम मंदिराचे भूमिपूजन बुधवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमात काही निवडक लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे.

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. अयोध्येतल्या या ऐतिहासिक प्रसंगासाठी भव्य तयारी सुरू आहे. रस्ते आणि इमारती सजवल्या जात आहेत. भूमीपूजनाचा पवित्र दिवस जवळ येत आहे. दीर्घ संघर्षानंतर हा क्षण प्रत्यक्षात येत आहे, म्हणून अभूतपूर्व तयारी सुरू आहे.

रामललाच्या मंदिराचे भूमिपूजन होण्यापूर्वी अयोध्या राममय झाले आहे. मंदिरे रंगविली जात आहेत. भगवा फडकतो आहे. आजपासून भूमिपूजनाचा तीन दिवसीय विधी सुरू झाला आहे. हा विधी ५ ऑगस्टपर्यंत चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *