आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टवरील ‘अनस्टॉपेबल’ सुंदरी

मारिया शारापोव्हा या टेनिस कोर्टवरच्या सौंदर्यसम्राज्ञीने पाच वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धाचं विजेतेपद पटकावलं. पण, खेळापेक्षाही आरस्पानी सौंदर्यामुळे ती चच्रेत राहिली. अगदी तरुण वयात ती टेनिस कोर्टवर उतरली आणि ३२व्या वर्षी निवृत्त झाली. वाढत्या वयात टेनिसपटूंच्या खेळाला अधिक बहर येतो असं म्हणतात. पण, मारियाने त्याच वयात निवृत्ती जाहीर केली. मारियाची टेनिस कोर्टवरची एक्झिट चाहत्यांना चुटपूट लावून गेली आहे .

मारिया शारापोव्हा हे टेनिस विश्वातलं लोकप्रिय आणि वलयांकित नाव. मारिया गेली काही वर्षे टेनिस कोर्टपासून लांब असली तरी आपल्या खेळाने, टेनिस कोर्टवरच्या बिनधास्त वावराने आणि मुख्यत्वे आपल्या सौंदर्याने तिने चाहत्यांच्या मनात निर्माण केलेलं स्थान अबाधित होतं. मारियाला दुखापतींनी ग्रासलं, कथित उत्तेजक द्रव्याच्या सेवनामुळे तिला बंदीला समोरं जावं लागलं. मारियाची बहरलेली कारकीर्द उतरणीला लागली आणि अखेर तिने निवृत्ती जाहीर केली. टेनिस कोर्टवरून एक्झिट घेताना मारियाला खूप वाईट वाटतंय. टेनिसशिवाय कसं जगायचं, हा प्रश्नही तिला सतावतोय. पण, मुळातच लढवय्यी असणारी मारिया या परिस्थितीतूनही नक्कीच मार्ग काढेल. खेळाडूची कारकीर्द तशी लहान असते. त्यातही टेनिस हा वेगवान खेळ. या खेळात तंदुरुस्ती महत्त्वाची. मारियाला तरुण वयातच ब-याच दुखापतींनी ग्रासलं. पण, त्यावर मात करत ती पुन्हा उभी राहिली. वाढत्या वयात टेनिसपटूचा खेळ ख-या अर्थाने बहरतो. पण, मारियाच्या बाबतीत असं घडलं नाही. तिशीनंतर तिला आधीची उंची गाठता आली नाही. गेल्या चार वर्षामध्ये मारिया महत्त्वाची स्पर्धा जिंकू शकली नाही. काळाची पावलं तिने ओळखली. आपल्यात आता फारसं टेनिस उरलेलं नाही हे कटू सत्य तिने पचवलं आणि टेनिसला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मारियाला असंख्य चाहत्यांचं प्रेम मिळालं. आता चाहत्यांना तिचं टेनिस कोर्टवर नसणं स्वीकारावं लागणार आहे.

१९ एप्रिल १९८३ रोजी रशियात जन्मलेल्या मारियाने १९९१ मध्ये म्हणजे वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी टेनिस रॅकेट हाती धरली. मारियाचे वडील युरी यांची अलेक्झांडर काफेलनिकोव्ह यांच्याशी मैत्री झाली होती. अलेक्झांडर यांनीच मारियाला टेनिस रॅकेट दिली. मग ही चिमुरडी वडिलांसोबत स्थानिक बागेत सराव करू लागली. मग मारियाला टेनिसचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण द्यायचं ठरलं. रशियातले आघाडीचे टेनिस प्रशिक्षक युरी युतकिन यांच्याकडून तिने टेनिसचे धडे घ्यायला सुरुवात केली. मारियाच्या सहजसुंदर खेळामुळे ते खूप प्रभावित झाले. ही मुलगी लंबी रेस का घोडा ठरणार हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. १९९३ मध्ये वयाच्या सहाव्या वर्षी मारिया मॉस्कोमध्ये मार्टनिा नवरोतिलोव्हाकडून चालवण्यात येणा-या टेनिस क्लिनिकला उपस्थित राहिली. मार्टनिाने तिचा खेळ पाहिला आणि अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये निक बोलेतेरी यांच्याकडून व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. निकने याआधी आंद्रे आगासी, मोनिका सेलेस आणि अ‍ॅना कुíनकोव्हा अशा दिग्गजांना प्रशिक्षण दिलं होतं. निक यांचं नाव ऐकताच, लहानग्या मारियाचे डोळे चमकले. पण, त्यावेळी तिच्या वडिलांकडे मुलीला अमेरिकेला नेण्याइतके पैसे नव्हते. मग त्यांनी कर्ज घेतलं. युरी आणि मारिया या दोघांनाही त्यावेळी इंग्रजी येत नव्हतं. पण, त्यांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. अखेर १९९४ मध्ये हे दोघं फ्लोरिडात दाखल झाले. व्हिसाशी संबंधित बंधनांमुळे मारियाच्या आईला दोन र्वष अमेरिकेला जाता आलं नाही. मारिया वडिलांसोबत अमेरिकेला आली, तेव्हा या कुटुंबाकडे फक्त ७०० अमेरिकन डॉलर होते. निक यांच्या आयएमजी अकादमीत प्रवेश मिळवण्यासाठी मारियाला बरीच मेहनत करावी लागणार होती. या अकादमीत प्रवेश मिळवण्यासाठी पात्र ठरेपर्यंत मारियाला टेनिसचे धडे घेणं आवश्यक होतं. यासाठी युरी यांनी अमेरिकेत छोटी-मोठी कामं करायचं ठरवलं. या माध्यमातून युरी यांनी मारियाच्या प्रशिक्षणासाठी निधी जमवला. मारियाने सुरुवातीला रिक मॅक्की यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. १९९५ मध्ये वयाच्या नवव्या वर्षी तिला तिला आयएमजीमध्ये प्रवेश मिळाला. अकादमीत राहण्यासाठी वर्षाला ३५ हजार डॉलर्सचं शुल्क भरावं लागणार होतं. हे शुल्क भरण्याची जबाबदारी आयएमजीनेच स्वीकारली आणि तिच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आयएमजीमध्ये मारियाच्या रूपात टेनिसचं भविष्य घडत होतं.

मारियाला खूप लवकर यश मिळू लागलं. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी म्हणजे २००० मध्ये तिने ईडी हर आंतरराष्ट्रीय ज्युनियर टेनिस अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. तिच्या या कामगिरीची दखल घेण्यात आली. मारियाला असामान्य गुणवत्तेचं दर्शन घडवणा-या खेळाडूंना देण्यात येणारा ‘द रायिझग स्टार’ पुरस्कार मिळाला. रशियाच्या या टेनिसपटूने २००१ मध्ये वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी व्यावसायिक टेनिसमध्ये पाऊल ठेवलं. २००२ मध्ये ती ‘पॅसिफिक लाईफ ओपन’ स्पर्धा खेळली. या स्पध्रेत तिला मोनिका सेलेसविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्याच वर्षात तिने ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनमध्ये मुलींच्या एकल स्पध्रेची अंतिम फेरी गाठली. ऑस्ट्रेलियन ओपन ज्युनिअर अजिंक्यपद स्पध्रेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी मारिया ही सर्वात तरुण खेळाडू ठरली. चौदा वर्षे आणि नऊ महिन्यांची असताना तिने ही कामगिरी करून दाखवली. यानंतर मारिया शारापोव्हा हे नाव अनेकांच्या तोंडी रुळू लागलं. कनिष्ठ गटात मारियाने दमदार कामगिरी करत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. कनिष्ठ गटातल्या तीन स्पर्धाचं विजेतेपद तिने पटकावलं, तर पाच स्पर्धामध्ये ती उपविजेती ठरली. २००३ मध्ये मारिया यशाच्या पाय-या अगदी झटपट चढली. ती ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीत सहभागी झाली. पण, या दोन्ही स्पर्धामध्ये तिला एकही सामना जिंकता आला नाही. २००३च्या अखेरीस तिने पहिल्या ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं होतं. विम्बल्डन स्पध्रेच्या मुख्य फेरीत तिला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला होता. या स्पध्रेत तिने अकराव्या मानांकित येलेना डॉकिकचा पराभव केला. टेनिस क्रमवारीतल्या आघाडीच्या २० खेळाडूंमधल्या एका खेळाडूला पराभूत करण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. मात्र, या स्पध्रेच्या चौथ्या फेरीत तिला स्वेतलाना कुझनेत्सोव्हाविरोधात पराभव पत्करावा लागला. या वर्षात तिला डब्ल्यूटीएचा ‘न्यू कमर ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला. जपान ओपन आणि द बेल चॅलेंज या स्पर्धाही तिने जिंकल्या होत्या. मारियाच्या पदरात यश पडत होतं.

२००४ मध्ये तिने टेनिस विश्वातल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या विम्बल्डन स्पध्रेचं विजेतेपद पटकावलं. या स्पध्रेच्या उपांत्य फेरीत तिने लिंडसे डेव्हनपोर्टचा पराभव केला, तर अंतिम सामन्यात तिने सेरेना विल्यम्ससारख्या तगडय़ा आणि अग्रमानांकित प्रतिस्पध्र्यावर मात केली. सेरेनाचा पराभव हा टेनिसविश्वासाठी खूप मोठा धक्का होता. मारिया ही स्पर्धा जिंकणारी तिस-या क्रमांकाची सर्वात युवा खेळाडू ठरली. या विजयामुळे मारियाची लोकप्रियता प्रचंड वाढली. माध्यमांनीही मारियाचं खूप कौतुक केलं. या विजयामुळे मारियाने टेनिक क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं. २००६ मध्ये तिने अमेरिकन ओपन स्पध्रेचं विजेतेपद मिळवलं. २००८ मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. २०१२ आणि २०१४ अशी दोन र्वष तिने फ्रेंच ओपन स्पध्रेचं विजेतेपद मिळवलं. टेनिस विश्वातल्या सर्व ग्रँड स्लॅम स्पर्धावर मारियाने आपलं नाव कोरलं. २००५ मध्ये तिने टेनिस क्रमवारीतलं पहिलं स्थान पटकावलं. सलग सहा आठवडे ती अग्रमानांकित होती. मात्र, नंतर लिंडसे डेव्हनपोर्टने मारियाला मागे टाकतं पहिलं स्थान पटकावलं. मधल्या काळात मारियाला ब-याच दुखापतींनी ग्रासलं. दुखापतींनंतरही ती पुनरागमन करत राहिली. खांद्याच्या दुखापतींनी ती बेजार होत राहिली. २००९-१० मध्ये तिच्या खांद्यांवर शस्त्रक्रिया झाली. मात्र, यानंतरही तिने पुनरागमन केलं. फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं. मारियाने कधीही हार मानली नाही. ती टेनिस कोर्टवर आपलं सर्वस्व पणाला लावायची. ‘अनस्टॉपेबल’ ही तिची आत्मकथा आहे. मात्र, प्रत्येक खेळाडूला कधी ना कधी थांबावंच लागतं. मारियाही थांबली आहे. पण, टेनिस विश्वातली एक दर्जेदार खेळाडू म्हणून तिने टेनिस चाहत्यांच्या हृदयात अढळ स्थान पटकावलं आहे.

संघर्ष मारियाचा
मारियाने २०१२च्या लंडन ऑलिम्पिक स्पध्रेत रौप्यपदक पटकावलं आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात ती सेरेना विल्यम्सकडून पराभूत झाली. २०१३ मध्ये तिच्या खांद्याच्या दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं. २०१६ मध्येही तिला असंख्या दुखापतींना सामोर जावं लागलं. पण, हे वर्ष तिला खूप मोठा धक्का देऊन गेलं. २०१६ च्या ऑस्ट्रेलियन ओपन दरम्यान उत्तेजक द्रव्य चाचणीत ती दोषी ठरली. मेल्डोनियम नामक प्रतिबंधित उत्तेजकाचे अंश तिच्या शरीरात आढळले. यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली. मारियाला व्यावसायिक टेनिस खेळता आलं नाही. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने तिच्यावर दोन वर्षाची बंदी घातली. पण, नंतर रशियन क्रीडा मंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे तिची बंदी २४ महिन्यांवरून १५ महिन्यांवर आणण्यात आली. २०१७ मध्ये तिने टेनिस कोर्टवर पुनरागमन केलं. मैदानावरचा तिचा झगडा सुरूच होता. २०१९ मध्ये तिला पुन्हा दुखापतींनी ग्रासलं. यामुळे मारियाला पुन्हा सूर गवसू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *