आज ट्रम्प यांच्या भवितव्याचा फैसला..! ट्रम्प की बायडेन..?

| मुंबई | अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, दरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, काही राजकीय जाणकारांच्या मते डोनाल्ड ट्रम्प हे पराभूत होतील असं म्हटलं जात आहे. या निवडणुकांमध्ये जो बायडेन यांचं पारडं जड असल्याचंही म्हटलं जात आहे. जर असं झालं तर १९९२ नंतर प्रथमच राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा निवडणूक जिंकणार नाहीत.

१९९२ मध्ये बिल क्लिंटन यांनी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा पराभव केला होता. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक संपल्यानंतर ट्रम्प वेळेपूर्वी विजय घोषित करतील अशा चर्चांना अमेरिकेतील राजकीय वर्तुळात उधाण आलं होतं.

परंतु ट्रम्प यांनी या वृत्ताचं खंडन केलं. “आपण असं काहीही करणार नाही.” असं ते म्हणाले. परंतु निवडणुका झाल्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे संकेत मात्र ट्रम्प यांनी दिले. निवडणुकीच्या रात्री वेळेपूर्वीच विजयाची घोषणा केली जाईल का? असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. “निवडणुकीनंतर मतपत्रिका गोळा करणं हे खूप धोकादायक आहे. मला असं वाटते की निवडणुका संपल्यानंतर लोकांना किंवा राज्यांना बऱ्याच काळासाठी मतपत्रिका सादर करण्याची परवानगी दिली जाते. तेव्हा ते धोकादायक आहे. कारण ती फक्त एक गोष्ट करू शकते,” असंही ट्रम्प यांनी उत्तर देताना सांगितलं.

न्यायालयाच्या निर्णयावर टीका

अनेक मतदान क्षेत्रातील निवडणुका झाल्यानंतर बॅलेट पेपर्स मिळू देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ट्रम्प यांनी टीका केली. “निवडणूक झाल्यानंतर त्याच रात्री आम्ही आमच्या वकिलांसमवेत तयार असू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांबाबत घोटाळा होण्याची शक्यताही ट्रम्प यांनी व्यक्त केली. “मला वाटतं की त्यात मोठा धोका आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते आणि या मतपत्रिकांचा गैरवापर होऊ शकतो. ही एक धोकादायक बाब आहे की संगणकाच्या आधुनिक दिवसांतदेखील निवडणुकीच्या रात्रीच निकाल कळू शकत नाहीत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्याचवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तम कामगिरी केली आहे. निवडणुकांच्या रॅलीलाही प्रचंड गर्दी होती. “आम्ही खूप चांगलं काम करत आहोत. फ्लोरिडामध्येही खूप चांगली कामगिरी आम्ही केली आहे. ओहियोमध्येही आपण ऐकलं असेल की आम्ही चांगलं काम करत आहोत. माझा असा विश्वास आहे की चार वर्षांपूर्वी आम्ही ओहियोमधील परिस्थितीपेक्षा कितीतरी पटीने चांगली कामगिरी करू. जर तुम्ही उत्तर कॅरोलिनाकडे पाहिले तर आम्ही खूप चांगले करत आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.

भारतीय वंशाच्या मतदारांची ताकद

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. अमेरिकेत २८ ऑक्टोबरपर्यंत ७.५ कोटींपेक्षा अधिक मतं देण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार यावेळीही याप्रकारचे ‘सायलेंट वोटर’च ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेत मतदानासाठी मेल किंवा लवकर मत देणं आणि दुसरं मतदान केंद्रांवर जाऊन मत देणं असे पर्याय उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *