![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/03/maharashtra-cm-devendra-fadnavis-and-his-wife-amruta-fadnavis_1568733461.jpeg?resize=880%2C528&ssl=1)
![](https://i0.wp.com/thelokshakti.com/wp-content/uploads/2020/03/maharashtra-cm-devendra-fadnavis-and-his-wife-amruta-fadnavis_1568733461.jpeg?resize=760%2C507&ssl=1)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया त्यागाच्या ट्वीटनंतर देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे तर विरोधकांनी त्यांच्या निर्णयावर खोचक टीका करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल मीडियाला रामराम ठोकण्याच्या निर्णयाची आपल्या आयुष्यात पुनरावृत्ती करण्याची तयारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केली आहे. अमृता यांनी स्वत: तसे संकेत दिले आहेत.
सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहणाऱ्या अमृता फडणवीस यांनी ट्वीट करुन सोशल मीडिया सोडण्याचा आपण निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. नरेंद्र मोदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेणार असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. एखाद्या छोट्याशा निर्णयाने आपले जीवन कायमचे बदलू शकते असेही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या या निर्णयावर सोशल मीडियातून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.