आता गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना दिलासा, ई पास काढताना गणेशोत्सव पर्याय निवडता येणार..!

| मुंबई | कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत राज्याअतंर्गत प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. ई-पास शिवाय एका जिल्हातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यावर बंदी आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात विनाकारण प्रवास करणे त्यामुळे शक्य नाही. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. हीच बाबत लक्षात घेत मुंबई पोलिसानी ई-पास काढण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना गणेशोत्सवाचाही पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

अत्यावश्यक सेवा, नातेवाईकांच्या मृत्यूसंबधी प्रवास, वैद्यकीय कारण किंवा इतर महत्त्वाच्या कारणांसाठी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी परवानगी मिळत आहे. आता यामध्ये गणेशोत्सवाचा पर्यायही सामील करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होतील. मुंबईतील नागरिकांनी https://mumbaipolice.co.in/ या लिंकवर क्लिक करून अर्ज करावा.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे व एस टी बस सेवा :

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. राज्य सरकारने याबाबत रेल्वे खात्याला पत्र लिहिलं आहे. प्रवाशांनी केलेल्या तिकीट बुकिंगनुसार गाड्या सोडल्या जाणार आहेत. आरक्षित तिकीट हाच ई-पास असणार आहे. रेल्वेने राज्य सरकारला याबाबत विचारणा केली होती. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबईच्या चाकरमान्यांसाठी ५ ऑगस्टपासून एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. त्यांचे प्रचलित तिकीट दरात, आगाऊ आरक्षण ४ ऑगस्ट मध्य रात्रीपासून सुरू झाले आहे. एका बसमध्ये केवळ २२ प्रवासी घेऊन एसटी बसेस ५ ऑगस्टपासून १२ ऑगस्टपर्यंत सोडण्यात येत आहेत. बसेसचे आगाऊ आरक्षण (एसटी महामंडळाच्या www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाने अधिकृतपणे नेमलेल्या खाजगी प्रतिनिधीद्वारे) नेहमीच्या तिकीट दरात प्रवाशांना करता येईल. तसेच, सदर बसेस ह्या विनाथांबा असल्याने (नैसर्गिक विधी वगळून)शेवटच्या थांब्या व्यतिरिक्त कुठेही थांबणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *