आता पुढचं टार्गेट मीच असेन याची मला खात्री आहे’ – अविनाश जाधव

| ठाणे | मनसे पदाधिकारी जमील शेख यांची भर दिवसा डोक्यात गोळी मारुन हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसापूर्वी भर दिवसा घडलेल्या या घटनेनंतर, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी, ‘माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील तर मलाही संरक्षण नको, आता पुढचं टार्गेट मीच असेन याची मला खात्री आहे’ असं म्हटलंय.

अविनाश जाधव म्हणाले, ‘जमील शेख हा कडवट मनसे सैनिक होता. तो नेहमी लोकांची काम घेऊनच कार्यालयात येत होता. दिवसरात्र तो जनसेवेसाठी झटत होता. ज्यावेळी त्याची हत्या झाली, त्याच्या आधी त्याने पक्ष कार्यालयात फोन करुन मी आहे का विचारलं आणि पाच मिनिटात येतो असं सांगितलं. तिकडून तो माझ्याकडे येत होता. मात्र ठाण्यासारख्या शहरात, कमिशनर ऑफिसपासून दहा मिनिटांच्या अंतरावर गोळी झाडून जर हत्या होत असेल, तर मी का संरक्षण घ्यावं? माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील, तर मी बॉडीगार्ड घेऊन फिरणं योग्य नाही. त्यामुळेच मी पोलीस संरक्षण हटवण्याबाबतचं पत्र पोलीस आयुक्तांना दिलं आहे. माझे कार्यकर्ते सुरक्षित नसतील, तर मी पोलीस संरक्षण घेऊन करु काय? असं त्यामध्ये म्हटलं आहे’

मला खात्री आहे की यापुढचं टार्गेट मीच असेन. त्यांनी एक एक करत पुढे आले आहेत. त्यामुळे त्यांचं पुढचं टार्गेट मीच असेन, याची मला खात्री आहे, असंही अविनाश जाधव म्हणाले. याआधीही 2014 मध्ये जमीलवर हल्ला झाला होता, आजपर्यंत त्याचे आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे काय बोलायचं? आता जो हल्ला झालाय, तो नीट प्लॅन करुन तो हल्ला केला. सराईत गुन्हेगारांचा वापर करुन, सुपारी देऊन हे हत्याकांड केलं. अतिशय जवळ येऊन जमीलला गोळी मारली. त्यामुळे ठाणे शहर सुरक्षित नाही, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published.