आता बिग बझारचे मालक पण अंबानी..!

| नवी दिल्ली | रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही ‘कब्जा’ केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) ने फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे.

हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून २४,७१३ कोटी रुपयांना ही डील झाली आहे. यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (आरआरएफएलएल) अंतर्गत येणार आहे.

रिलायन्स बिग बझार ताब्यात घेतल्यानंतर फ्युचर ग्रुप एंटरप्रायझेसमध्येही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स १२०० कोटी रुपये गुंतवणार आहे. तसेच ६.०९ टक्के हिस्साही खरेदी करणार आहे. याशिवाय ४०० कोटी रुपये इक्विटी वॉरंटच्या रुपात गुंतविणार आहे. यामुळे एकूण ७.०५ टक्के हिस्सा हा रिलायन्सकडे राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *