आता राज्यातील ३०० जिल्हा परिषद शाळा होणार आदर्श शाळा..!

| पुणे / विनायक शिंदे I राज्यातील सर्व जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामधील एक जिल्हा परिषद शाळा अशा ३०० शाळा सर्व सोयीयुक्त व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा निर्माण केल्या जाणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या विधीमंडळाच्या दुसऱ्या अधिवेशनात म्हणजेच मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात घोषित करण्यात आल्यानुसार जिल्हा परिषदेच्या ३०० शाळा आदर्श शाळा विकसित केल्या जाणार आहेत. यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जिल्हानिहाय प्रत्येक तालुक्यातील एक अशा ३०० संभाव्य शाळा निवडण्यात आल्या आहेत. या सर्व शाळा इयत्ता १ली ते ७ वी वर्गाच्या असतील, इ. ८वी चा वर्ग जोडण्यास वाव असेल अशा असतील.

आदर्श शाळा निर्मितीमध्ये भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण , प्रशासकीय बाबी हे महत्त्वाचे घटक असतील तसेच आदर्श शाळेत पाठ्यपुस्तकाच्या पलिकडे जाऊन उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करून शिक्षक शिकवतील. विद्यार्थाना वाचन – लेखन , भाषा गणित विषयांतील मूलभूत संकल्पना, गणिती क्रिया येणे अनिवार्य असेल. तसेच आदर्श शाळेत २१ व्या शतकातील कौशल्य जसे नवनिर्मितीला चालना देणारे, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती, संविधानिक मूल्ये अंगी बाणविणे, काम करण्याचे कौशल्य, संभाषण कौशल्य या सारखी कौशल्य विकसित केली जातील.

कृतीयुक्त अध्ययन – अध्यापन , ज्ञान रचनात्मक व आनंददायी शिक्षण देण्यात येईल. आकर्षक इमारत, सुसज्ज वर्गखोल्या , स्वतंत्र शौचालये स्वच्छतागृह , पिण्याच्या पाण्याची सोय, ग्रंथालय , आयसीटी लॅब, सायन्स लॅब, क्रिडांगण, क्रिडा साहीत्य अशा शालेय भौतिक सोयीसुविधांनी परिपूर्ण आदर्श शाळा असणार आहेत. अशा शाळांमध्ये काम शिक्षकांना काम करावेसे वाटेल, या शाळमध्ये बदली करुन शिक्षकांना यावेसे वाटेल, ५ वर्ष बदली करावी वाटणार नाही.

या आदर्श शाळांमध्ये इतर शाळांमधून विदयार्थी होतील . राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील स्कूल कॉम्पलेक्स ही संकल्पना या आदर्श शाळाच्या माध्यमातून राबविले जाईल. या शाळांमधील विदयार्थाची शैक्षणिक गुणवत्ता, शिकण्याची गती, विदयार्थांचा सामाजिक शैक्षणिक विकास, सर्वंकष व्यक्तिमत्त्व विकास विदयार्थांना जिल्हा परिषद आदर्श शाळांकडे आकर्षित करतील.

सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संभाव्य शाळांची पडताळणी करुन ६ नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करावयाचा आहे. त्यानंतर या ३०० आदर्श शाळा अंतिमतः निश्चित होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *