आदित्य ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र, सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

| मुंबई | देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जातोय. अशाच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा मुद्दा गाजताना दिसतोय. आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांची बाजू मांडताना दिसत आहेत. सध्या नीट आणि जेईई परीक्षांच्या मुद्द्यावरुनही राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. अशात युवा सेनेचे नेते व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. तर काही जणांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व प्रश्न आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्याची तसेच परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरेंनी या पत्रात लिहिलं की, ‘आपल्या नेतृत्वाखाली देश करोनाविरूद्ध लढा देत आहे. या कार्यात नागरिकही प्रामाणिकपणे आपलं योगदान देत आहेत. मात्र मी विद्यार्थ्यांकडे तुमचं लक्ष वळवू इच्छितो आहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या काळात अनेक लोक हे घरुनच कामे करत आहे. मात्र अनेक शैक्षणिक संस्था विद्यापीठ, व्यावसायिक व अव्यासायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेणार असल्याचं म्हणत आहेत. पण आतापर्यंतच्या निरीक्षाणावरुन जगभरात ज्यांनी ज्यांनी शाळा, महाविद्यालये सुरू केली, तिथे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे दिसतेय. त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की, या विषयात हस्तक्षेप करून सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावे. त्याचबरोबर आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात यावे. असे केल्यास कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही. विविध शाखांच्या परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणात पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा’ असे पत्र लिहित आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *