आधी समर्थनार्थ स्पष्टीकरण आता तर क्रांतिकारक कुर्बान हुसेन यांचा धडाच वगळला!

| मुंबई | कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यासाठी अनिश्चितता कायम असल्याने शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. त्यात मागील मागील काही दिवसांमध्ये गाजलेला आठवीच्या मराठी पुस्तकातील क्रांतिकारक कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला धडाच वगळला आहे.

आठवीच्या मराठी ‘बालभारती’च्या पुस्तकात ज्येष्ठ साहित्यिक यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा’ या पुस्तकातील माज्या देशावर माझे प्रेम आहे हा पाठ ठेवण्यात आला होता. त्यात भगतसिंग, राजगुरू या दोघांसोबत कुरबान हुसेन फासावर गेले, असा उल्लेख होता तर त्यात सुखदेव यांचे नसल्याने त्याबाबत शिक्षकांसह काही घटकांनी आक्षेप नोंदवला होता. यानंतर कुरबान हुसेन यांचेही स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे, याकडे बालभारतीने लक्ष वेधले होते. शालेय शिक्षण विभागाने अभ्यासक्रम २५ टक्के कमी करताना कुर्बान हुसेन यांचा उल्लेख असलेला पाठच वगळला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या समन्वयाने आणि अभ्यासक्रम समितीच्या निर्णयानुसार संबंधित विषयाचे सर्व अभ्यासक्रम मंडळ सदस्यांमार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी अभ्यासक्रमाचा मूळ गाभा तसाच ठेवून प्राथमिक स्तरावरील २२, माध्यमिक स्तरावरील २० आणि उच्च माध्यमिक स्तरावरील ५९ असे एकूण १०१ विषयांचा इयत्तानिहाय, विषय निहाय २५ टक्के पाठ्यक्रम करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम कमी करताना कृतिशील शिक्षणाला बगल देण्यात आल्याने शिक्षण संघटनांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जे कृतीशील शिक्षण असते त्यालाच वगळल्याने त्याचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनाही तोटा होणार असल्याचे शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *