आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा रोप वे सुरू, महाड कोर्टाची परवानगी..!

| महाड | कोरोना आणि जागेच्या वादामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेला रायगड रोपवे सुरु करण्यास परवानगी देणारे आदेश महाड न्यायालयाने दिले आहेत.

कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून रायगड रोप वे बंद ठेवण्यात आला होता. दरम्यानच्या काळात हिरकणीवाडी येथील औकिरकर कुटुंबाने रोपवेच्या जागेवर दावा सांगत अडथळे टाकून रोप वे बंद केला होता. त्या विरोधात रोपवेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जोग इंजिनिअरिंग कंपनीने महाड न्यायालयात दाद मागितली होती.

रायगड जिल्ह्यातील सर्व ऐतिहासिक स्थळे खुली करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यानंतर रायगडवर येणाऱ्या पर्यटक शिवभक्तांची रोपवे अभावी गैरसोय होवू लागली. याच मुद्यावर जोग इंजिनिअरिंग कंपनीने रोपवे सुरु करण्यास परवानगी मागणारी याचिका महाड न्यायालयात केली होती.

रोपवेच्या जागेसंदर्भात न्यायालयात जो वाद सुरु आहे त्याचा जो काही निकाल लागेल तो आम्हाला मान्य राहील. मात्र तोपर्यंत शिवभक्तांची गैरसोय होवू नये यासाठी रोपवे सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी रोपवेतर्फे न्यायालयात करण्यात आली होती.

हाच मुद्दा विचारात घेवून न्यायालयाने रोपवे सुरु करण्याचे आदेश दिले. रोपवेच्या दैनंदिन कामकाजामध्ये कुणीही कोणत्याही प्रकारचे अडथळे आणू नयेत असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

गेल्या आठ नऊ महिन्यांपासून रोपवे बंद आहे. रोप वे यंत्रणेचा आवश्यक तो मेंटेनन्स करून सात ते आठ दिवसांत रोपवे वाहतूक सुरु करण्यात येईल अशी माहिती या निकालानंतर रोपवे प्रशासनाकडून देण्यात आली. रोपवे सुरु करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर या निकालाचे शिवभक्त, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे.

( mahad court permission to start raigad ropeway )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *