‘ आमचं ठरलंय ‘ : राज्यात नव्या पक्षाचा उदय, निवडणूक आयोगाकडून मान्यता

| कोल्हापूर | ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापुरात आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये ‘आमचं ठरलंय’ इतर मातब्बर पक्षांना भिडण्याची शक्यता आहे.

‘आमचं ठरलंय विकास आघाडी’ या पक्षाला महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढवता येणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाची नोंदणी करुन घेतली आहे.

प्रमोद पाटील हे ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’चे प्रमुख आहेत. गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे ते समर्थक आहेत. लोकसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात ‘आमचं ठरलंय’ या कॅम्पेनचे बोर्ड जागोजागी लावण्यात आले होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. “आमचं ठरलंय” असं म्हणत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली. त्याचा फटका महाडिक यांना बसला आणि त्यांना तब्बल दोन लाख ७५ हजार मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

शिवसेना खासदार संजय मंडलिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या ‘आमचं ठरलंय’ची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतर विधानसभेला याचा दुसरा अंक पाहायला मिळाला होता. आता स्थानिक राजकारणात सतेज पाटील यांना या नव्या पक्षाने बळकटी येणार आहे की कसे हे आगामी काळच ठरवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *