आयुक्तांना केलेली शिवीगाळ भोवली, मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस..!

| ठाणे | मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांनी फेसबुकला व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली. अविनाश जाधव यांना मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलन प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्या वेळी त्यांनी थेट आयुक्तांना अपशब्द देखील वापरले होते. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

अविनाश जाधव ठाण्यामध्ये महापालिकेबाहेर कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी आंदोलन करत असतानाच ही नोटीस बजावण्यात आली. यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मी गेली अनेक वर्षे सातत्याने लोकांसाठी आंदोलन करतो. कोणतेही आंदोलन मी स्वत:साठी केलेले नाही. वसईतही जे आंदोलन केले होते ते कोविड सेंटरसाठी केले होते. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून मला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

ठाण्यात एवढे गुंड आहेत ते हद्दपार होत नाहीत. मी लोकांसाठी सातत्याने भांडत असतानाही मला तडीपारीची नोटीस पाठवली. लोकांसाठी कोणी भांडायचे नाही का? माझी पहिली सभा झाली तेव्हा मला एक कोटींचा दंड लावला होता. त्याचदिवशी मला तडीपारीच्या नोटीस येतील असे म्हटले होते. लोकांचं काम करतो, समस्या सोडवतोय म्हणून मला हे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले बक्षीस आहे, अशा शब्दांत अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *