इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पदी सौ. स्वाती शेंडे यांची निवड..

| इंदापूर/ महादेव बंडगर | इंदापूर पंचायत समितीच्या विद्यमान सभापती सौ. पुष्पा अविनाश रेडके यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सभापतीपदाची माळ स्वाती बाबुराव शिंदे यांच्या गळ्यात पडली असून पुन्हा एकदा इंदापूर पंचायत समितीवर हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांची सत्ता आली आहे. सौ. स्वाती बापुराव शेंडे यांनी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल दादासाहेब वनवे यांचा तीन मतांनी पराभव केला. या निवडणुकीमध्ये स्वाती शेंडे यांना आठ तर शीतल वनवे यांना पाच मते मिळाली.

मंगळवारी (दि. 20 ऑक्टोबर) सभापती पुष्पा रेडके यांनी स्वेच्छेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती पदाकरिता निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी काम पाहिले.

या निवडीप्रसंगी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मावळत्या सभापती पुष्पा रेडके यांचेही अभिनंदन केले असून त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे कामकाज त्यांनी केलेले आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कोरोनाच्या कालावधीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवले आहे. त्याचबरोबर माजी सभापती करणसिंह घोलप यांनीही अतिशय उत्तम काम केलेले आहे. विद्यमान उपसभापती संजय देहाडे हे सुद्धा अतिशय जबाबदारीने उत्तम पद्धतीने काम करत असून सभापती आणि उपसभापती सर्व सदस्यांच्या मदतीने पंचायत समितीचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख करतील असेही असं पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी माजी सभापती करणसिंह घोलप, मावळत्या सभापती पुष्पा रेडके, नवनिर्वाचित सभापती सौ. स्वाती शेंडे, पंचायत समिती सदस्य ॲड. हेमंत नरुटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, उदयसिंह पाटील, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, माजी सभापती विलासराव वाघमोडे, बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, नगरपालिकेचे गटनेते कैलास कदम व पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील गटाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. अनेक ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यमान उपसभापती संजय देहाडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *