उत्तर प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय : आग्रा येथील संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव.!

| लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील निर्माणाधीन मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याची घोषणा केली. हे संग्रहालय आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, असे ते म्हणाले. हे संग्रहालय ताजमहालच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ उभारले जात आहे. हा १५० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. या ट्विटमध्ये योगींनी म्हटले आहे, ‘आग्रा येथे निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशात गुलामीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या चिन्हांना कुठलेही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिन्द, जय भारत.’

यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने, राज्यातील ११ हुतात्म्यांच्या नावाने त्यांच्या जिल्ह्यातील एक-एक रस्त्याचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिसूचनादेखील काढली आहे. या विभागाकडून जय हिंद वीर पथ योजनेची घोषणाही करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी या रस्त्यांवर हुतात्म्यांच्या सन्मानार्थ मोठ-मोठे आकर्षक बोर्ड लावण्याचे निर्देशदेखील दिले आहेत.

या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित वस्तू आणि दस्तावेजदेखील असतील. यापूर्वी लखनौचे मुख्य पर्यटन सचिव जितेंद्र कुमार यांनी पर्यटन अधिका-यांना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या संग्रहालयात गॅलरी तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. या गॅलरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीसंदर्भातील दस्तऐवजदेखील बघायला मिळतील.

फडणवीसांकडून कौतुक

योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच या निर्णयाचे स्वागत केले. फडणवीस यांनी योगींचे ट्विट रीट्विट करत शिवरायांचा जयजयकार केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, असे ट्विट करत फडणवीस यांनी योगी सरकारचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *