उद्यापासून राज्यात थिएटर, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू..!

| मुंबई | राज्यातील थिएटर, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह उद्यापासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता स्विमिंग पूल सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मार्च २०२०च्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना सुरु करण्यास संमती देण्यात येत आहे.

थिएटर, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्युट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही मुभा देण्यात आली आहे.

अनलॉक ५ मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरु होणार असल्याने थिएटर्स मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.