उद्या भारत बंद, सर्व महत्वाच्या विरोधी पक्षांचा पाठिंबा..!

| नवी दिल्ली | केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतक-यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू आहे. येत्या मंगळवारी शेतकरी संघटनांनी या कायद्यांचा निषेध करण्यासाठी भारत बंद पुकारला आहे. आता देशभरातील विविध राजकीय पक्षांनी शेतक-यांच्या या भारत बंदला पाठिंबा दिला आहे. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पक्षासह देशातील सर्व विरोधी पक्षांनी शेतक-यांनी पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दर्शवला आहे.

शेतक-यांच्या समर्थनार्थ ११ विरोधी पक्षांनी एक निवेदन जारी केलं आहे. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, पीएजीडी, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय, सीपीएम, सीपीआय (एमएल), आरएसपी, आरजेडी, द्रमुक आणि एआयएफबी यांनी शेतक-यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि कृषी कायदा २०२० मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. आम्ही शेतक-यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला आणि त्यांनी पुकारलेल्या भारत बंदला आमचा पाठिंबा आहे, असं विरोधी पक्षांनी या निवेदनात म्हटलं आहे.

नवीन कृषी कायदे हे संसदेत लोकशाहीची पायमल्ली करून बनवण्यात आले आहे. या कायद्यांवेळी मतदान आणि चर्चाही झाली नाही. हे कायदे देशाच्या अन्नसुरक्षेसाठी धोकादायक आहेत. यामुळे आपला शेतकरी आणि कृषी व्यवस्था नष्ट होईल. यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ९ डिसेंबरला रात्री ९ वाजता राष्ट्रपतींना भेटण्यासाठी वेळही मागितला आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

समाजवादी पार्टी यात्रा काढेल
शेतक-यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे उद्यापासून किसान यात्रा काढण्याच्या तयारीत आहे. उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात सपा किसान यात्रा काढली जाईल अशी घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे.

काय आहे शेतक-यांची तयारी?
शेतकरी नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ८ डिसेंबरला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत भारत बंद पुकारण्यात आला आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम असेल. रुग्णवाहिका आणि लग्न समारंभासाठी रस्ते खुले असतील. सर्वच ठिकाणी शांततेत निदर्शनं करण्यात येतील. चंदिगडमध्ये सेक्टर १७ च्या मैदानावर शेतकरी ७ तारखेला मोठं आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकरी नेते बलदेवसिंग निहालगड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *