एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी आला ‘ हा ‘ दिलासादायक निर्णय..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत सेवेत दाखल झालेल्या चालक आणि वाहकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. यामुळे साडेचार हजार कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर त्याचा मोठा फटका परिवहन सेवांना बसला. राज्य परिवहन महामंडळाची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे एसटीचा प्रवासी सेवा हा उत्पन्नाचा प्रमुख मार्ग बंद झाला. लॉकडाऊन लांबत चालल्याने एसटी महामंडळाने जुलै महिन्यात एक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला होता. साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आणणारा हा निर्णय होता.

एसटीची सेवा पूर्वपदावर येण्यासाठी अजून बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वाहतुकीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचे नमूद करत सरळसेवा भरतीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड चालवण्यात आली होती. २०१९ मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत चालक व वाहक पदामध्ये रोजंदार गट क्र. १ मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा तात्पुरत्या खंडित करण्यात आल्या होत्या. आज एका आदेशाद्वारे हा निर्णय रद्द करण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची खंडित करण्यात आलेली सेवा पूर्ववत करण्यात यावी व गरजेनुसार नियमित वेतनश्रेणीवरील चालक व वाहकांचाच वापर करण्यात यावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

त्याचवेळी अनुकंपा तत्त्वावरील प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणास देण्यात आलेली स्थगितीही उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरील संकट तूर्त दूर झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *