कोकणातील प्रवाशांसाठी ही आहे खूशखबर..!

| मुंबई |कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन लॉकडाऊनपासून या मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, काही विशेष गाड्या सुरु आहेत. दरम्यान, गणपती उत्सवासाठी मागणी वाढल्यानंतर काही विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. आता पुन्हा दादर – सावंतवाडी ही तुतारी एक्स्प्रेस विशेष गाडी सोडण्याची निर्णय घेण्यात आला आहे. ही गाडी २६ सप्टेंबर २०२० पासून चालविण्यात येणार आहे. उद्यापासून आरक्षण करता येणार आहे.

दादर – सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस स्पेशल ट्रेन क्रमांक ०१००३/०१००४ ही गाडी पावसाळी वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत धावणार आहे. त्यानंतर म्हणजे १ नोव्हेंबर २०२० पासून नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.

रेल्वे क्रमांक ०१००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस विशेष दादरहून २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी रात्री १२.०५ वाजता सुटेल. त्याच दिवशी गाडी सावंतवाडी रोडला दुपारी १२:२० वाजता पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस स्पेशल सावंतवाडी रोड येथून २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ७.३० वाजता सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.४५ वाजता दादरला पोहोचेल.

नियमित वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबर २०२० पासून रेल्वे क्रमांक ०१००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस विशेष दादर येथून रात्री १२.०५ वाजता सुटेल. त्याच दिवशी सकाळी १०.४० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०१००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस स्पेशल सावंतवाडी रोड येथून १ नोव्हेंबर २०२० पासून संध्याकाळी ७.१० वाजता सुटेल. ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी ६.४५ वाजता दादरला पोहोचेल.

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर ही गाडी थांबेल.

या एक्स्प्रेस गाडीला एकूण १९ कोच असणार आहेत. यात टू टायर एसी – १ कोच, थ्री टायर एसी – ४ कोच, स्लीपर – ८ कोच, सेकंड सीट – ४ कोच, एसएलआर – २ यांचा समावेश आहे. या गाडीचे आरक्षण उद्या २४ सप्टेंबर २०२० पासून होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हे बुकिंग करता येणार आहे. तसेच कोविड-१९च्या संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे आणि रेल्वे स्थानकांवर केले जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *