कोकण प्रेमी पर्यटकांसाठी खूशखबर; MTDC चे कोकणातील रिसॉर्ट, हॉटेल्स सुरू..!

| रत्नागिरी | लॉकडाऊनच्या काळात कंटाळा आलेल्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची अतिशय बातमी आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारंट आणि ईपासबाबत काही नियम शिथिल केल्यानंतर आता महाराष्ट्र पर्यटन मंडळानं देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार आजपासून MTDC चे कोकणातील सर्व रिसॉर्ट आणि ह़ॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत. सध्या तरी किमान ३३ टक्के बुकिंग घेतली जाणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं ही बुकिंग होणार असून पर्यटकांना शासनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे कोकण विभागाचे प्रादेशिक अधिकारी दिपक माने यांनी याची माहिती दिली आहे.

काय आहेत नियम :

• पर्यटकांना सेल्फ डिक्लरेशनचा फॉर्म भरून देणे अनिवार्य असून कोविडबाबतची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे.
• तसेच पर्यटकाचे तापमान, त्याच्या शरिरातील ऑक्सिजनची लेव्हल देखील तपासली जाणार आहे.
• फेसमास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर देखील अनिवार्य असून गर्दी होणार नाही याची देखील काळजी घेतली जाणार आहे.
• तर, कन्टेनमेंट झोनमधील पर्यटकाला मात्र यावेळी बंदी असणार आहे.
• शिवाय, ज्या ठिकाणी क्वॉरंटाईन सेंटरकरता या रिसॉर्ट आणि हॉटेलचा वापर केला गेला होता ती सर्व टप्प्याटप्प्यानं सुरू केली जाणार आहेत.

दरम्यान, सध्याच्या घडीला केवळ ३३ टक्के बुकिंग केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं यामध्ये वाढ केली जाणार आहे. ३३ टक्के ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य दिलं जाणार असून त्यानंतर काऊंटर बुकिंग केली जाणार आहे,. पण, ३३ टक्के ऑनलाईन बुकिंग पूर्ण झालेली असल्यास काऊंटर बुकिंग मात्र केली जाणार नाहीत. याबाबत शासनानं आदेश देखील काढले असून यामध्ये पर्यटकानं काय काळजी घ्यावी, नियम काय असणार आहेत याची इत्यंभूत माहिती दिली आहे. त्यामुळे आता वेळणेश्वर, गणपतीपुळे, सिंधुदुर्गमधील कुणकेश्वर येथील हॉटेल्स सुरू केली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *