कंगना रणौत, बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश..!

| मुंबई | सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंगना हिच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोलीविरोधीतही एफआयआर दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे. कंगना आणि रंगोली ट्विट आणि मुलाखतींच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप आहे. आजतकने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

वांद्रे कोर्टात कंगनाविरोधात दोन व्यक्तींनी याचिका दाखल केली होती. याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, कंगना बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय ती हिंदू-मुस्लीम समुदायात धार्मिक तेढही निर्माण करत आहे. कंगना वारंवार आक्षेपार्ह ट्विट करत असून यामुळे केवळ धार्मिक भावनाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर पुरावे म्हणून कंगनाचे ट्विट्स आणि व्हिडीओ सादर केले. त्यानंतर कोर्टाने कलम १५६ (३) अंतर्गत एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

याचिकाकर्त्यांना आधी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यावेळी कोर्टाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल कऱण्याचा आदेश दिला. कंगना बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत सगळीकडे विरोधात बोलत असल्याचाही उल्लेख यावेळी कोर्टात करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *